Talegaon Dabhade News: बेकायदा वृक्षतोड! 500 वृक्षांची लागवड, 50 हजार रुपये दंड अन् एकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – तळेगावदाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील कृष्णा आकार गृहनिर्माण सोसायटीच्या पाठीमागील मंत्रा सिटी जवळील ओढ्यालगतच्या बेकायदा वृक्षतोडीबाबत एच.सी.कटारिया अँड ईगल इन्फ्रा या ठेकेदाराला स्व:खर्चाने 500 रोपांची लागवड, कुमार ईलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स यांना 50 हजार रुपये दंड आकारण्यात आला. तर, सुर्या राठोड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी उद्यान विभागाला दिले आहेत.

मंत्रा सिटी जवळील ओढ्यालगत वृक्षतोड झाल्याबाबत स्थानिक नागरिकांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी नगर परिषदेच्या उद्यान विभागास माहिती दिली. त्यानुसार उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन यांनी स्थानिक वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निलेश गराडे यांच्यासमवेत स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. ही वृक्षतोड कोणाकडून झाली हे स्पष्ट होत नसल्याने त्याठिकाणी सुरु असलेल्या नगरपरिषद भुयारी गटार योजनेचे ठेकेदार एस.सी. कटारिया अँन्ड ईगल इन्फ्रा, विद्युत पोल काटण्याचे काम करत असलेले कुमार ईलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन सुर्या राठोड यांना नोटीस दिली होती. सात दिवसांच्या आत तिघांकडून खुलासा मागविला होता.

तिघांनीही खुलासा सादर केला. वृक्षतोडीबाबत आमचा काही संबंध नाही, भुयारी गटार योजनेच्या ठिकाणी काम करत असलेले कामगार, अभियंता यांचा वृक्षतोडीशी काही संबंध नाही. ठेकेदार म्हणून कोणालाही वृक्षतोडीबाबत मी सांगितले नाही. त्याउलट वृक्षामुळे कामास अडचण येत असल्याचे नगरपरिषदेला पत्राद्वारे कळविले होते. वृक्षतोड करुन काम करायचे असते तर पत्रव्यहार केला नसता. फक्त पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. कोणतीही वृक्षतोड करण्यात आली नाही. वृक्षतोडीसाठीचे कोणतेही कटर मशीन नाही. वृक्षतोड झालेल्या ठिकाणी काम करत आहे म्हणून वृक्षतोड आम्ही केली असा अर्थ लावू नये असा खुलासा एच.सी.कटारिया यांनी केला.

तर, कुमार ईलेक्ट्रिकल्स यांनी खुलाशात म्हटले आहे की, वृक्षतोड झालेल्या ठिकाणी काम केले. परंतु, कोणतीही वृक्षतोड केली नाही. वृक्षांच्या फांद्या छाटण्यासंदर्भात महावितरण विभागाने नगरपरिषद कार्यालयास पत्र दिले आहे. विद्युत विषयक काम करताना अपघात टाळण्यासाठी धोकादायक फाद्यांची छाटणी आमच्याकडून करण्यात आली. कामगारांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड मात्र केलीली नाही. सुर्या राठोड यांनी खुलाशात म्हटले की, आम्ही मोलमजुरी करणारे भटके लोक रस्त्यावरील लाकूडफाटा गोळा करतो. म्हणून आम्हाला या प्रकरणात गोवण्यात आले. वृक्षतोडीशी आमचा काही संबंध नाही. केवळ दुस-यांच्या सांगण्यावरुन या प्रकरणात माझे नाव गोवण्याता आल्याचा खुलासा त्यांनी केला.

प्रशासनाला तिघांचेही खुलासे मान्य झाले नाहीत. त्यामुळे एच.सी. कटारिया यांना नगरपरिषद हद्दीत उद्यान विभागाच्या निगराणीखाली स्व:खर्चाने किमान 500 वृक्षांची लागवड करण्याचे आदेश दिले. त्यात वड 150, पिंपळ 125, कदंब 100, कांचन 75 आणि स्पथोडीया 50 अशी एकूण 500 रोपे लावावी लागणार आहे. रोपांची उंची किमान 6 फुट असणे बंधनकारक राहील. कुमार ईलेक्ट्रिकल्स यांनी 50 हजार रुपये दंड पुढील तीन दिवसाच्या आत नगरपरिषद वृक्ष फंडात जमा करावा. तर, सुर्या राठोड यांच्यावर नगरपरिषदेच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.