Chakan : चाकण पंचक्रोशीतील अंत्यविधीची व्यवस्था पालिका पाहणार

स्वर्गरथ पालिकेच्या ताब्यात; स्मशानभूमीत कर्मचारी नेमणार

एमपीसी न्यूज –  चक्रेश्वर मंदिर देवस्थान परिसर ( Chakan) स्मशानभूमी येथे कार्यरत असलेला अर्बन बँकेने दिलेला स्वर्गरथ अखेर बँकेने आता चाकण नगरपरिषद यांच्या ताब्यात दिला आहे.  दि.24  ऑगस्ट 2023 पासून नगरपरिषदकडे बँकद्वारा स्वर्गरथ ताबा देण्यात आला आहे. त्याबाबत कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती बँकेचे अधिकारी व चाकण पालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे. यापुढे चाकण पालिका व पंचक्रोशीतील अंत्यविधीची व्यवस्था पालिका पाहणार आहे.
चाकण नगरपरिषदद्वारा स्वर्गरथाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  नगरपरिषद हद्दीत पाचशे रुपये व बाहेरील गावांना एक हजार रुपये शुल्क स्वर्गरथातून शव स्मशान भूमीपर्यंत घेऊन येण्यासाठी आकारले जाणार आहे.  त्यामुळे आता स्वर्गरथ वाहनाचे चालक व स्मशान भूमी व्यवस्था चाकण नगरपरिषद ताब्यात घेणार आहे. पालिकेत फोन वा प्रत्यक्ष सूचना दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी शव स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी चाकण नगरपरिषद त्याच प्रमाणे नाणेकरवाडी,कडाचीवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी ग्रामपंचायत,चाकण ( Chakan) पोलीस स्टेशन आणि चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष माजी आमदार राम कांडगे यांना लेखी पत्राने या बाबतची माहिती दिली आहे.  चाकण नगरपरिषद व लगतच्या ग्रामपंचायती यांच्या माध्यमातून एकत्रित येऊन सर्व स्मशान भूमी व्यवस्था करण्यात येणार आहे.

चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांनी देखील स्मशानभूमी जागा व अंत्यविधी सेवा समिती वापरत असलेले विद्यमान कार्यालय चाकण नगरपरिषद व 4 ग्रामपंचायत यांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती ट्रस्ट अध्यक्ष माजी आमदार राम कांडगे यांनी दिली आहे. चाकण पालिकेचा कर्मचारी याठिकाणी 24 तास उपलब्ध राहणार आहे.  याबाबत आणखी आवश्यक ती व्यवस्था नगरपरिषद करणार असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
असे चालणार कामकाज 
चाकण नगरपरिषद येथील स्वर्गरथ व अंत्यविधी सेवा समिती कार्यालय ताब्यात घेणार आहे.  नगरपरिषद कर्मचारी यांना फोन वा प्रत्यक्ष सूचना दिल्यावर ते मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन येणार आहेत. मयत व्यक्ती ज्या ठिकाणची त्या नगरपरिषद किंवा संबंधीत ग्रामपंचायतीस लेखी अहवाल दिला जाणार आहे.
यामुळे मृत्यू दाखला व अन्य कार्यवाही देखील सुलभ होणार आहे.  तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायती एकत्रितपणे देखभाल दुरुस्ती सह स्मशाभूमीतील व्यवस्था व विकास कामे स्वच्छ्ता याबाबत काम करणार आहे. तसेच उत्तरकार्य व धार्मिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व अन्य व्यवस्था देखील नगरपरिषद करणार आहे. यासाठी  चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सहकार्य करणार असून तशी ना हरकत देखील ट्रस्टद्वारा देण्यात आली आहे.
चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड.राम कांडगे यांनी सांगितले कि,  नगरपरिषद प्रशासनाने हे कां हाती घेतल्याने स्मशाभूमीतील व्यवस्था पाहण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध होणार आहे. मंदिर परिसर विकास आराखाडा नगरपरिषद करत असून त्यांना सर्व सहकार्य ट्रस्ट करत आहे सर्व ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आली असल्याचे देखील कांडगे ( Chakan) यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.