Chikhali : बिबट्याचा वावर नाही; तरीही काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज – चिखली, जाधववाडी परिसरात सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने खळबळ उडाली. वनविभागाने केलेल्या शोधमोहिमेनंतर हा बिबट्याचा वावर नसून उदमांजर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उदमांजराची शक्यता असली तरीदेखील नागरिकांनी काळजी घ्यावी, बिबट्या सदृश प्राणी पुन्हा आढळल्यास वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

चिखली, जाधववाडी परिसरातील नागरिकांना सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राणी दिसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी परिसरात रात्री अडीच वाजेपर्यंत शोधमोहीम राबवली. नागरिकांना दिसलेला बिबट्याच असल्याची कुणाकडूनही खात्री झाली नाही. त्याच्या पायाचे ठसे देखील वनविभागाला मिळाले नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा वनविभागाच्या तज्ज्ञांनी परिसरात शोधमोहीम राबवली आहे.

आसपास असलेली मानवी वसाहत आणि औद्योगिक परिसरामुळे चिखली आणि जाधववाडी परिसरात बिबट्या येणं शक्य नाही. वनविभागाला ज्यांनी माहिती दिली, त्यांना विचारले असता त्यांनी स्वतः बिबट्याला बघितले नसून त्यांना कुणीतरी सांगितले होते. सांगणा-या व्यक्तीला विचारले असता त्याला देखील कोणीतरी सांगितले असल्याचे समोर आले. ज्याने बिबट्या बघितला असा कोणीही नागरिक वनविभागाला मिळाला नाही.

बिबट्या ज्या परिसरात आढळतो, त्या परिसरात कुत्र्यांचा वावर कमी होतो. मात्र, चिखली आणि जाधववाडीच्या बिबट्या आढळल्याच्या परिसरात कुत्र्यांचा देखील वावर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे नागरिकांना उदमांजर दिसले असल्याची शक्यता आहे. उदमांजर दिसल्याची शक्यता असली तरी देखील वनविभागाने परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिबट्या अथवा बिबट्या सदृश काही आढळल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.