Chikhali : दारू पाजून लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला

एमपीसी न्यूज – तरुणास दारू पाजून त्यास लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शंकरनगर येथे घडली.

समरसिंह श्रीनिवास रेड्डी (वय 17, रा. नारायणनगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन बबन कांबळे (वय 32, रा. शंकरनगर, धोबीघाट, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समरसिंह यांना आपल्या मित्राला चिंचवड येथे भेटण्यासाठी यायचे असल्याने त्यांनी एक मोटार बुक केली. मात्र ती मोटार येण्यापूर्वीच आरोपी कांबळे तिथे मोटार घेऊन आला. तुम्ही मोटार बुक केली आहे का, अशी विचारणा करीत समरसिंह यांना आपल्या मोटारीत बसविले. त्यानंतर शंकरनगर येथे नेऊन कांबळे याने समरसिंह यांना जबरदस्तीने दारू पाजली.

त्यानंतर समरसिंह यांच्या खिशातील 50 हजार रुपयांचा मोबाईल व तीन हजार रुपये रोख असा ऐवज काढून घेतला. समरसिंह यांनी आपला मोबाईल आरोपीकडे मागितला. मात्र त्यांनी नंतर देतो, असे म्हणत मोबाईल देण्यास टाळाटाळ केली. यामुळे समरसिंह यांनी चालत्या मोटारीचा हँडब्रेक दाबून ती उभी करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरडा ओरडा केला. यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी कांबळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.