BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तरुणाची सव्वादोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दुकान भाड्याने देऊन त्यात व्यवसाय करण्यासाठी दुकानावर कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तरुणाची 2 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 सप्टेंबर 2018 ते 14 जानेवारी 2019 या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

सिद्धार्थ मुंजाजी ओटले (वय 30, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रमेश श्रीरंग सरोदे (रा. फुले नगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉवर लाईन मोरेवस्ती येथे अंगणवाडी रोडवर 160 चौरस फुटांचे एक दुकान आहे. ते दुकान स्वतःचे असल्याचे आरोपी रमेश याने भासवले. त्याद्वारे दुकानावर व्यवसाय करण्यासाठी महात्मा फुले बेरोजगार योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून देण्याचे रमेश याने सिद्धार्थ यांना आमिष दाखवले. कर्ज मंजूर देण्यासाठी सिद्धार्थ यांच्याकडून 20 हजार रुपये घेतले.

आरोपी रमेश याने सिद्धार्थ यांच्यासोबत भाडेकरारनामा न करता स्वतः मालक असल्याचे सांगत सहमती पत्र देऊन दुकान सिद्धार्थ यांना भाड्याने दिले. दुकानावर कर्ज मंजूर होईपर्यंत दुकान उघडू नका, असे सांगून 30 हजार रुपये दुकानाचे भाडे घेतले. त्यानंतर आरोपीने सिद्धार्थ यांनी दुकानात ठेवलेले जुने 12 संगणक, 2 एलसीडी मॉनिटर, 3 प्रिंटर, एक लॅमिनेशन, कीबोर्ड, माऊस असे एकूण 1 लाख 85 हजार रुपयांच्या साहित्याचा अपहार केला. आरोपी रमेश याने सिद्धार्थ यांचा विश्वासघात करून शॉपमधील मालासह एकूण 2 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3