Chikhali: तक्रारदार महिलेची छेड काढल्या प्रकरणी सहाय्यक फौजदार तडकाफडकी निलंबित

पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची कारवाई

एमपीसी न्यूज – पती सोबत भांडण झाल्याने तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलेल्या महिलेची जुजबी तक्रार घेऊन त्यानंतर रात्री-अपरात्री फोन करून तिचा विनयभंग करणा-या सहाय्यक फौजदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

रामनाथ पालवे असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव असून त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पालवे हा चिखली ठाण्याअंतर्गत येणा-या साने चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहे. तर, तक्रारदार महिला एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. तिचे पतीबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे ती महिला तिच्या मुलाला घेऊन तक्रार देण्यासाठी बुधवारी (दि.11) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास साने चौकीत गेली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सहाय्यक फौजदार पालवे याने महिलेची जुजबी तक्रार नोंदविली.

त्यानंतर तिने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मध्यरात्री पालवे याने संपर्क केला. तिच्याशी बोलताना अश्लिल भाषेचा वापर करून महिलेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर संबंधित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला असता वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी संबंधित सहाय्यक पोलीस फौजदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी तातडीने पालवे याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.