Chinchwad Bye-Election : 1 लाख 86 हजार मतदारांना वाटल्या वोटर स्लिप

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने मतदारांना घरपोच वोटर स्लिप वाटण्यात येत आहेत. (Chinchwad Bye-Election) आज अखेर 1 लाख 86 हजार स्लिप वाटप करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत वोटर स्लिप पोहोचल्या जातील यासाठी निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूक यंत्रणेची तयारी सुरु असून गट स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या 510 बीएलओ तसेच 84 नोडल अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना घरपोच वोटर स्लिप वाटप केल्या जात आहेत. तसेच मतदारांना मतदान केंद्र कुठे आहे याबाबत ही माहिती दिली जात आहे. सुमारे 5 लाख 68 हजार व्होटर स्लीप वाटण्याचे नियोजन असून 20 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांनी वोटर स्लिप वाटपाचे नियोजन केले आहे. या मतदार संघातील मतदार निवडणूक प्रक्रीये पासून दूर राहू नये यासाठी विशेष नियोजन केले जात असून चिंचवड विधानसभा मतदार संघात 510 मतदान केंद्र असून या केंद्रांवर दिव्यागांसाठी सुविधा उपलब्ध असणार आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य करण्याकरिता स्वयंसेवक नेमले जाणार आहे.

Pune News : महाराष्ट्रातील 43 पोलीस अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक

निवडणूक विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात (Chinchwad Bye-Election) तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या-छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे तसेच चार्ली चॅप्लिनच्या वेषामधील कलाकाराच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.

मागील मतदानावेळी कमी संख्येने मतदान झालेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करून विशेष मोहिम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. निवडणूक मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायकांना प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून एकूण तीन टप्प्यात त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली असून निवडणुकीच्या कामकाजाची प्रकिया अंतिम टप्प्यात आली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रयत्न केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.