Chinchwad Bye Election : राजकीय घडामोडींना वेग; अश्विनी जगताप, नाना काटे, रेखा दर्शिले यांच्यासह 17 व्यक्तींनी घेतले 32 अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येताच राजकीय घडामोडींना वेग येवू लागला आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा दर्शिले यांच्यासह 17 व्यक्तींनी आज (गुरुवार) 32 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर, एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी आहे. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक असताना अद्यापही भाजप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले नाहीत. महाविकास आघाडी एकत्रित की स्वतंत्र लढणार याबाबत देखील स्पष्टता नाही.

भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातच दिली जाणार हे स्पष्ट आहे. पण, त्यांच्या कुटुंबातील दोघे जण तीव्र इच्छुक आहेत. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे. परिणामी, शहर भाजपने एकाच्याही नावाची शिफारस (Chinchwad Bye Election) अद्यापपर्यंत प्रदेशकडे केली नाही.

त्यातच जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी एक पाऊल पुढे टाकत भाजपसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. एका महिला कार्यकर्तीची माध्यमातून त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. त्यामुळे अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या 9 जणांच्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यात मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा दर्शिले यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Chakan News : एमएसएमई क्षेत्रासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आशादायी; उद्योजक संघटनेकडून स्वागत

17 व्यक्तींनी घेतले 32 अर्ज

हरीश भिकोबा मोरे, विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे, सोयल शहा युनूस शहा शेख, रेखा राजेश दर्शले, संजय भिकाजी मागाडे, किशोर आत्माराम काशीकर, अक्षय विनोद जाधव, हिरामण बाबु बाबर, अश्विनी लक्ष्मण जगताप, जितेंद्र रामचंद्र वाडघरे, विजय सुभाष कलाटे, प्रकाश रामचंद्र बालवडकर, उमेश महादेव म्हेत्रे, कैलाश दशरथ परदेशी, डॉ.बाळासाहेब उर्फ सोमनाथ अर्जुन पोळ, विनायक सोपान ओव्हाळ आणि सुभाष गोपाळराव बोधे अशा 17 जमांनी 32 अर्ज घेतले आहेत.

दरम्यान, 31 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आजअखेर पर्यंत एकूण 3 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन पत्रे (Chinchwad Bye Election) दाखल केलेली आहेत. तर, 62 व्यक्तींनी 108 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.