Chinchwad Bye-Election : निवडणूक बिनविरोध करावी; भाजपची विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांकडे विनंती

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी लागलेली पोटनिवडणूक बिनविरोध करावी. (Chinchwad Bye-Election) जगताप कुटुंबातील कोणत्याही उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा करू नये, अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे कैलास कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांची भेट घेवून केली. त्याबाबत लेखी पत्रही त्यांना दिले.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या नेत्यांनी आज (शनिवारी) विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. लेखी पत्र देवून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली.

भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रिपाइंचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे आदी उपस्थित होते.

काय म्हटले आहे विनंती पत्रात?

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेले दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दि. 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. (Chinchwad Bye-Election) या दुख:तून अद्याप जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय समर्थक कार्यकर्ते आणि हितचिंतक अद्याप सावरले नाही. तोच पोटनिवडणुकीची घोषणा झाली.

भूमिपुत्र म्हणून स्वर्गीय लक्ष्मणभाऊंनी पिंपरी-चिंचवड शहरात गेले 35 वर्षे राजकारण-समाजकारणात योगदान दिले. पक्षीय जोडे बाजुला ठेवून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी ठेवली. त्यामुळे तुमच्या-माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले.

सर्वपक्षीय नेत्यांशी तसेच केंद्र आणि राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळेच लक्ष्मणभाऊ पिंपरी- चिंचवडचे लोकनेते होते. (Chinchwad Bye-Election) लक्ष्मणभाऊंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीमुळेच तुमच्या-माझ्यासारखे कार्यकर्ते घडले. अनेकांना महापालिका आणि पक्षांच्या माध्यमातून विविध महत्वाच्या पदावर आपल्याला संधी मिळाली. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लक्ष्मणभाऊंच्या मदतीमुळेच शक्य झाले. हे आपल्याला विसरुन चालणार नाही.

आज जगताप कुटुंबीय दुःखात आहे. अशा परिस्थितीत आपल्या राजकीय जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेल्या मार्गदर्शनाची आणि मदतीची परतफेड करण्याची ही वेळ आहे. कारण, केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, व्यावसायिक जीवनात त्यांनी आपल्याला वेळोवेळी मदतच केली आहे.

त्यामुळे आपण सद्सद् विवेकबुद्धीने विचार करून जगताप कुटुंबीयातून कोणत्याही उमेदवाराविरोधात आपला उमदेवार उभा करू नये, अशी एक पिंपरी-चिंचवडकर म्हणून माझी अपेक्षा आहे, असे विनंती पत्रात म्हटले आहे. या पत्रावर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीनही पक्षाच्या शहराध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.