Chinchwad : दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावल्या दीड लाखांच्या सोनसाखळ्या

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या हिसकावल्या. शहरात दोन घटनांमध्ये एक लाख 45 हजार रुपये किमतीचे सोने जबरदस्तीने चोरून नेले. दोन्ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री आठ ते नऊ या कालावधीत घडल्या. याबाबत एमआयडीसी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विषाखा विलास बोरावके (वय 59, रा. मोशी प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी दुचाकीस्वारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा सोमवारी रात्री आठच्या सुमारास महाराजा चौक येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी विशाखा यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली. याबाबत त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

संभाजीनगर चिंचवड येथे झालेल्या घटनेत अंजली बापूराव जोशी (वय 67, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटरसायकल वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री पावणेनऊच्या सुमारास अंजली त्यांची सून आणि दोन नाती यांच्यासोबत संभाजीनगर येथून रस्त्याने पायी जात होत्या. काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी अंजली यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची एक लाख पाच हजार रुपये किमतीची सोन्याची मोहन माळ जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिसात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like