Chinchwad Crime News : पैसे घेऊन जमिनीचा ताबा न दिल्या प्रकरणी कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – जमीन खरेदीचा व्यवहार ठरवून त्या व्यवहारात आगाऊ रक्कम घेतली. कोरोना साथीमुळे पुढील खरेदी प्रक्रिया करता आली नाही. दरम्यान जमीन विक्री करणाऱ्याने जमिनीचा ताबा न देता घेतलेली एक कोटी 63 लाख 40 हजार एवढी रक्कम परत दिली नाही. याबाबत खरेदीदार शेतकऱ्याने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवलाख उंब्रे येथील एका शेतकऱ्याने याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात लक्ष्मीकांत केडीया (रा. रहाटणी) यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार फेब्रुवारी 2020 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 14 येथे खरेदीखत करण्यात आले. ताथवडे येथील आठ आर जमीन आणि त्यावरील 22 हजार 780 चौरस फूट बांधकाम नवलाख उंब्रे येथील शेतकऱ्याने 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्याचे ठरले. त्यातील एक कोटी 63 लाख 40 हजार एवढी रक्कम नवलाख उंब्रे येथील शेतकऱ्याने लक्ष्मीकांत केडिया यांना धनादेश, आरटीजीएस आणि रोख स्वरूपात दिली.

त्यानंतर केडिया यांना दोन कोटी 11 लाख 80 हजार रुपये रक्कम देणे बाकी होते. दरम्यान कोरोना साथीमुळे संपूर्ण देशभर लाॅकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे एक महिन्याच्या कालावधीत खरेदीदार शेतकऱ्याला पुढील व्यवहार करता आला नाही. यामुळे केडिया यांनी उर्वरित दोन कोटी 11 लाख 80 हजार रुपयांची रक्कम आता मला नको. तसेच एक कोटी 63 लाख 40 हजार ही रक्कम मी परत देणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच दुसरी पार्टी पाहून ती जागा विकणार असल्याचे केडिया यांनी नवलाख उंब्रे येथील शेतकऱ्याला सांगितले.

शेतकऱ्याने केडिया यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात केडिया यांनी एक कोटी 63 लाख 40 हजार एवढी रक्कम घेऊन जमिनीचा ताबा दिला नाही. तसेच घेतलेले पैसे परत दिले नाहीत. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खरेदीदार शेतकऱ्याने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.