Chinchwad Crime News : क्रिकेटवरील बेटिंगमध्ये लाखोंचे कर्ज; पैशांचा तगादा लावल्याने केला खून

एमपीसी न्यूज – क्रिकेटवरील बेटिंगमध्ये सुमारे 18 ते 20 लाख रुपये कर्ज झाले. त्या कर्जाचा तगादा लावल्याने दोघांनी मिळून पैसे मागणा-याचा खून केला. विजय सर्जेराव सुर्वे (वय 40, रा. चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो क्रिकेटवर बेटिंग  घेत होता. त्याचे आरोपींकडे लाखो रुपये कर्ज झाल्याने त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

हर्षद अशोककुमार राठोड (वय 29, रा. निगडी) याला पोलिसांनी 11 मार्च रोजी तर त्याचा साथीदार महंमद इकलाख महंमद इद्रिस (वय 33, रा. दिल्ली) याला 15 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुर्वे यांचा मृतदेह मुळशी खुर्द येथे सापडल्यानंतर सुरुवातीला याबाबत पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहरातील लिंक मिळाल्याने हा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे आणि पिंपरी पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करून शोध सुरु करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी हर्षद राठोड याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करून पोलिसांनी त्याचा साथीदार इद्रिस याला निगडीमधून अटक केली.

दोघांकडे तपास केला असता, मयत विजय सुर्वे हा क्रिकेटवर बेटिंग करत होता. त्यातून आरोपी हर्षद त्याच्याकडे आकर्षित झाला आणि त्याने बेटिंगवर लावण्यासाठी तब्बल 18 ते 20 लाख रुपये सुर्वे यांच्याकडून घेतले. घेतलेले पैसे सुर्वे यांनी परत मागितले असता आरोपी हर्षद आणि इद्रिस यांनी मिळून सुर्वे यांना जमीन दाखवण्याच्या बहाण्याने काळभोरनगर चिंचवड येथून कारमधून ताथवडे येथे मोकळ्या जागेत नेले.

तिथे सुर्वे यांच्यावर कठीण वस्तूने मारून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द येथे टाकला, असे आरोपींनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पौडचे पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, बडेसाब नाईकवाडे, पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.