Chinchwad : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; साडेआठ लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून आठ लाख 60 हजार रुपये किमतीचे 19 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 31, रा. औंध, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदी सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. दळवीनगर येथे एक व्यक्ती संशयीरित्या पायी फिरत असल्याचे चिंचवड पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विविध पोलीस ठाण्यात 85 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच त्याने मागील एक महिन्यापूर्वी चिंचवड येथील गिरिराज हाऊसिंग सोसायटी आणि दळवीनगर भागात घरफोडी केल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून आठ लाख 60 हजार रुपये किमतीचे 19 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक झेंडे, आटवे, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्निल शेलार, ऋषिकेश पाटील, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, अमोल माने यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.