Chinchwad : दुचाकीवर डबल सीटला परवानगी नाही, मग आम्ही कामावर जायचं कसं ?

Double seat on a bike is not allowed, so how do we get to work? : अत्यावश्यक सेवेत काम करणा-या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. पण केवळ प्रवासामुळे कोरोना रोखता येणार नाही. या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणा-या अनेक महिला, पुरुषांना कोणतेही वाहन चालवता येत नाही. मग आम्ही कामावर जायचे नाहीच का, असा संतप्त सवाल या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाने राज्यात थोड्या अधिक प्रमाणात दुचाकीवरून केवळ एका व्यक्तीला प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसह अन्य बाबी देखील सुरु केल्या जात आहेत.

अत्यावश्यक सेवा आणि अन्य आस्थापनांमध्ये काम करणा-या अनेक महिला आणि पुरुष असे आहेत, ज्यांना कोणतेही वाहन चालवता येत नाही.

तसेच प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा अन्य कोणते वाहन असेलच असे नाही. त्यात भरीस भर म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. एखाद्या मार्गावर सुरु असली तरी तिचा सर्वच अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना लाभ घेता येईल, असेही नाही.

प्रशासनाने केलेल्या नियमांची पोलीस कठोरपणे अंमलबजावणी करीत आहेत. डबलसीट जाताना एखादा व्यक्ती, महिला दिसल्यास पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहेत. त्यामुळे आम्ही प्रवास करायचा नाही का ? असा संतप्त सवाल हे नागरिक विचारत आहेत.

एका महिलेने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, मी एका रुग्णालयात नोकरी करत आहे. मला दुचाकी येत नाही. त्यामुळे माझे बाबा मला रुग्णालयात सोडायला येतात.

मी ज्या भागातून येते त्या भागात सार्वजनिक वाहतूक सुरु नाही. रुग्णालयात येत असताना अनेक ठिकाणी पोलीस अडवतात व दंड आकारतात. हा प्रकार माझ्यासोबत वारंवार घडत आहे. बाबांनी याबाबत जिल्हाधिका-यांकडे देखील तक्रार केली आहे.”

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, “प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पोलीस अंमलबजावणी करत आहेत. नागरिकांनी दुचाकीवरून डबलसीट फिरू नये.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.