Chinchwad : उत्पादकता वाढविण्यासाठी आपल्या कामात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा – शैलेश थिटे

एमपीसी न्यूज – उत्पादकता वाढविण्यासाठी आपल्या कामात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, असे आवाहन युनीथर्म इंजिनिअर्स कंपनीचे चिफ ऑपरेटींग ऑफिसर शैलेश थिटे यांनी पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी केले.

भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये राज्यस्तरीय 34 वे अ‍ॅन्यूवल चॅप्टर कन्व्हेन्शन 2019 संपन्न झाले. त्यात विविध उद्योग संस्थेतील सभासदांनी केलेल्या प्रबंध सादरीकरण स्पर्धेत सर्वाधिक 15 सुवर्णपदके पटकाविण्याचा मान तळेगाव येथील जे.सी.बी. इंडिया लिमिटेड ने मिळविला.

या स्पर्धेत गोवा, अहमदाबाद, महाराष्ट्रातील 56 उद्योग संस्थांमधील विविध गटात झालेल्या स्पर्धेत गुणवत्तेसंदर्भात सिंक्स सिग्मा, कायझेन, क्वॉलिटी सर्कल आदी विषयांचा समावेश होता.

उद्योग संस्थेमधील सुमारे 156 संघांनी समूहाद्वारे स्पर्धेत प्रबंध सादरीकरण केले. त्यात एकूण 600 सभासदांचा सहभाग होता. यात यशस्वी विजेत्या संघांना 105 सुवर्ण पदके, 40 रजत पदके तर 9 कांस्य पदक सन्मानपूर्वक शैलेश थिटे, एस.एम.आर.सी. कंपनीचे प्रकल्प संचालक सतिश लडवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षितेसाठी भित्तीपत्रक आणि स्लोगन स्पर्धेत 15 पारितोषिके विजेत्यांना बहाल करण्यात आली. त्यात सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाचा समावेश होता. सर्व पदके स्मृतीचिन्ह स्वरूपात देण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन सकाळच्या सत्रात के.के. नाग कंपनीचे अध्यक्ष मिलन नाग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावरती संस्थेच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर, पदाधिकारी अनंत क्षीरसागर, माधव बोरवणकर, संजीव शिंदे, प्रकाश यार्दी उपस्थित होते.

पारितोषिक वितरणप्रसंगी शैलेश थिटे म्हणाले, राज्यभरात विविध उत्पादकांचे असंख्य उद्योगसंस्था आहेत. हजारो कर्मचारी त्यात काम करतात. उद्योग संस्थांमधील सर्व विभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुमची निवड करून स्पर्धेसाठी तुम्हाला पाठविण्यात आले, म्हणून मला तुमचा हेवा वाटतो. कारण मी, इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर चिफ इंजिनिअर म्हणून काम करीत होतो. त्यावेळी स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी जरी मिळाली नाही. परंतु आज तुम्हाला माझ्या हस्ते यशस्वी संघांना पारितोषिके देण्याची संधी क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने दिली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे.

तुम्ही काम कोणतेही करा पण, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध करीत मी आज सहा प्रकल्पाचा प्रमुख आज आहे. तुम्ही काम करीत असलेल्या उद्योग संस्थेत तुमची मानसिकता जर सकारात्मक असेल तर बाकीच्या इतर गोष्टी गळून पडतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा व जास्तीत जास्त उत्पादकता वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.

एस.एम.आर.सी. कंपनीचे प्रकल्प संचालक सतीश लडवा म्हणाले, उद्योग संस्थेतील कामगार ते व्यवस्थापकापर्यंत काम करणार्‍यांनी जे काम करणार ते उत्तमात उत्तम करा. आज औद्योगिक मंदीच्या काळात विविध उद्योग संस्थांमधील कामगार व व्यवस्थापन या दोघांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ते यशस्वीपणे पेलायचे असेल तर प्रत्येकाने आपापल्या कामात प्रयत्नशील असले पाहिजे.

के.के. नाग कंपनीचे अध्यक्ष मिलन नाग म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया या संस्थेचा मुख्य उद्देश गुणवत्ता व्यवस्थापन व गुणवत्ता संकल्पनाच्या प्रचार व प्रसार गेली अनेक वर्षे सातत्यपणे देशभरातील उद्योग संस्थेसाठी करीत आहे. सन 1990 साली भारत देशाने उदारीकरणाचे धोरण अवलंबल्यामुळे त्यावेळी अनेक उद्योग संस्थांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागले. आमच्या कंपनीने त्यावेळी सखोल विचार करून उद्योग संस्थेमधील प्रत्येक कर्मचार्‍याचा सहभाग वाढवून छोटे-छोटे समूह निर्माण करून त्यात होणारा अनावश्यक खर्च शोधून तो कमी करण्यात व्यवस्थापनाला यश मिळाले.

वीज, पाणी, विद्युत, कच्चामाल उत्पादन वस्तूला लागणारा कालावधी यामध्ये बचत झाली व उद्योग संस्थेला निश्चितच फायदा झाला. त्यावेळी ग्राहकांच्या इच्छा, अपेक्षा जाणून त्यांना हवी असलेली गुणवत्तापूर्वक वस्तूंची निर्मिती करण्यात आली. उद्योग संस्थेतील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील अंतर कमी झाले तरच, उद्योग संस्था टिकेल व आपण जगणार ही भावना वाढीस लागली. आमच्या या सर्व वाटचालित क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने बहुमोल मार्गदर्शन प्रशिक्षणाद्वारे दिले. आज आपल्याला मंदीच्या सावटीतून बाहेर येण्यासाठी इतर उद्योग संस्थांनीही योग्य अनुकरण करावे, असे आवाहन केले.

स्पर्धेचे परीक्षण शैलेश तुपे, विनय पाटील, दिगंबर मेटे, हनुमंत बनकर, प्रदीप कुमार, निखिला शिरोडकर, परवीन तरफदार आदी तज्ञांनी केले. दोन्ही सत्रात प्रस्तावना फोरमच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर यांनी केले. सूत्रसंचालन विजया रुमाले, अनंत क्षीरसागर यांनी तर, आभार माधव बोरवणकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फोरमचे चंद्रशेखर रुमाले, सुनिल वाघ, प्रशांत बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.