Chinchwad News : साहित्य, कला, चित्रपटातून चुकीचा इतिहास भारतीयांच्या मनात भिनवला – राहुल सोलापूरकर

एमपीसी न्यूज – ब्रिटिशकाळ ते सन 2014 पर्यंत आपल्या देशाने षंढयुग अनुभवले. या काळात साहित्य, कला, चित्रपट या माध्यमातून चुकीच्या संकल्पना आणि खोटा इतिहास भारतीयांच्या मनांत भिनवला गेला. भारताचे सत्त्व अन् स्वत्व अबाधित ठेवण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या असंख्य अज्ञात वीरांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना खरा इतिहास शालेय पातळीपासून मांडला जावा!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी चिंचवडगाव येथे केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या 123व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात राहुल सोलापूरकर बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजी तथा आप्पा गवारे, मंदारमहाराज देव, चापेकर स्मारक समिती कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शीतल खोत, रवींद्र गोळे, नितीन बारणे, गतिराम भोईर, अशोक पारखी, मधुसूदन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे लिखित आणि विवेक प्रकाशननिर्मित ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रमेश पतंगे यांनी आपल्या मनोगतातून, “गिरीश प्रभुणे यांना सामाजिक जीवनात ज्या व्यक्ती भेटल्या अन् भावल्या त्यांची व्यक्तिचित्रे ‘परिसांचा संग’ या पुस्तकात शब्दांकित करण्यात आली आहेत. या लेखनात व्यक्तिचित्रणातील सर्व साहित्यमूल्ये आढळून येतात!” असे मत व्यक्त केले.

गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या पन्नास वर्षांच्या कालावधीतील विविध उपक्रमांचा आढावा घेऊन बुद्धकाळापासून रामजन्मभूमीमुक्ती काळापर्यंतचा सचित्र इतिहास सहा मजली संग्रहालयाच्या रूपाने उभारण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

यावेळी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ, गुलाबपुष्प प्रदान करून गौरविण्यात आले. त्यामध्ये चिंचवड देवस्थान ट्रस्ट, धनेश्वर विश्वास मंडळ, मयूरेश्वर मित्रमंडळ, काळभैरव उत्सव समिती, श्रीराम मंदिर संस्थान, हनुमान भजनी मंडळ, नवभारत मित्रमंडळ, संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ, मराठा वधू-वर सूचक मंडळ, उत्कृष्ट तरुण मंडळ, ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघ, गजाननमहाराज मंडळ संघ, नवतरुण मित्रमंडळ, अखिल वेताळनगर उत्सव समिती, क्रांतिवीर समशेरसिंग भोसले मंडळ (श्रीगोंदा) यांचा समावेश होता.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची शौर्यगाथा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी या गटात आविष्कार बदर (प्रथम), केतन सांगडे (द्वितीय), तनुष्का पवार (तृतीय), मनस्वी दरंदळे (उत्तेजनार्थ); इयत्ता पाचवी ते सातवी या दुसऱ्या गटात श्रेयस बाकले (प्रथम), संग्राम गिऱ्हे (द्वितीय), आरती कदम (तृतीय), आकांक्षा रोडे (उत्तेजनार्थ); इयत्ता आठवी ते नववी या तिसऱ्या गटात रिया हावळे (प्रथम), श्रावणी सोनवणे (द्वितीय), हर्षद हंकारे (तृतीय), स्वप्निल चव्हाण (उत्तेजनार्थ) आणि खुल्या गटात शुभम् मोटे (प्रथम), गणेश शिंदे (द्वितीय) यांचा समावेश होता.

त्यापूर्वी, सकाळी साडेसात वाजता समरसता गुरुकुलम्पासून चापेकर पुतळा, भक्ती-शक्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, निगडी येथील लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप, वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद साळवे, पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. गुरुकुलम् मधील विद्यार्थी, शिक्षक यांनी ऐतिहासिक वेषभूषा परिधान करून ढोलताशा, लेझीम यांच्या निनादात ध्वज मिरवीत आणि देशभक्तिपर गीते गात चापेकर स्मारक समितीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक अभिवादन फेरीमध्ये सामील झाले होते.

प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर आसाराम कसबे यांनी आभार मानले. संपूर्ण वंदेमातरम् सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.