PMPML News: ग्रामीण मासिक पास सुविधा पूर्ववत सुरू करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) च्या माध्यमातून पुणे ग्रामीण हद्दीतील प्रवासासाठी असलेले मासिक पास सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने शहरी, ग्रामीण भागासाठी असलेला दैनंदिन 70 रुपयांचा, तर मासिक 1400 रुपयांचा पास एप्रिलपासून पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेर पीएमपीने प्रवास करताना तिकीट काढण्याशिवाय पर्याय नाही. या निर्णयाचा महापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशी हद्द गृहीत धरून त्यापुढे ये-जा करण्यासाठी पास उपलब्ध होणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे शहर व ग्रामीण भागाकरिता नागरिकांच्या प्रवासासाठी अतिशय मोलाचा आणि हक्काचा पर्याय म्हणून आपल्या विभागाकडे पाहिले जतो. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक रस्त्यांवर दळणवळण करिता प्रशासनाकडून चांगली सेवा दिली जात आहे.

 

ग्रामीण भागातून पुणे व पिंपरी-चिंचवडच्या शहरी भागात लाखो नागरिक नोकरीनिमित्त तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत प्रवास करीत असतात. प्रवास करणारे नागरिक सर्वसामान्य कुटुंबातील असून ते आपल्या बससेवेचा उत्तमप्रकारे लाभ घेत आहेत. त्यानुसार आपल्या विभागाने पुणे ग्रामीण हद्दीतील दैनिक पास व मासिक पास सुविधा पुन्हा सुरू करावी, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.