Chinchwad : चिंचवड पोलीस स्टेशन अंतर्गत वाल्हेकरवाडी पोलीस चौकीचे उदघाटन

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी वाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी व्हावी, अशी नागरिकांची मागील अनेक वर्षांपासून असलेली मागणी प्रजासत्ताक दिनी पूर्ण झाली. चिंतामणी चौकातील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवरील तीन गुंठे जागेत बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उदघाटन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.

पोलीस चौकी उदघाटन समारंभासाठी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, स्वीकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, राजू दुर्गे, अमोल थोरात, शेखर चिंचवडे, बाळासाहेब वाल्हेकर, उद्योजक ओमप्रकाश पेठे, तात्या आहेर, श्रीधर वाल्हेकर, आबा वाल्हेकर, दीपक वाल्हेकर, निलेश भोंडवे, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “एखाद्या परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढला की तेथे पोलीस चौकी निर्माण करावी लागते. परंतु पोलीस चौकी होणे हे परिसराला भूषणावह नाही. भविष्यात गुन्हेगारी वाढु नये, यासाठी सर्व नागरिकांमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बल उपलब्ध नाही, तरी सुद्धा पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिशोई म्हणाले, “नवीन निर्माण झालेल्या पोलीस चौकीमुळे वाल्हेकरवाडी परिसरातील महिला, विद्यार्थिनी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहतील. येथे नियुक्त असणारे पोलीस कर्मचारी येथेच नागरिकांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. नवीन निर्माण झालेले पोलीस आयुक्तालय हे महापालिकेच्या जागेत आहे. आयुक्तालयासाठी स्वतःच्या मालकीची स्वतंत्र जागा नाही. आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती केली जाते. परंतु कालांतराने पोलीस चौकी कर्मचा-यांअभावी बंद होतात. असा प्रकार या चौकीबाबत होणार नाही, याची पोलीस प्रशासन पूर्णपणे दखल घेईल. असे सांगत आयुक्त बिष्णोई यांनी भयमुक्त आणि सुरक्षतेची नागरिकांना हमी दिली.

नगरसेवक सचिन चिंचवडे म्हणाले, “वाल्हेकरवाडी प्रभाग भयमुक्त व गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी तसेच महिला सुरक्षिततेसाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन, जागेसाठी प्राधिकरण प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आपली पोलीस चौकीची मागणी पूर्ण झाली आहे. या पोलीस चौकीमुळे नागरिक, महिला, विद्यार्थिनी अधिक सुरक्षित राहतील, असा मला विश्वास आहे.

प्रास्ताविकात बोलताना पोलीस उपायुक्त स्मिता पाटील म्हणाल्या, “चिंचवड विभागात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत सर्वाधिक गुन्हे वाल्हेकरवाडी विभागात होत असल्याची नोंद आहे. हे गुन्हे कमी होण्यासाठी ही पोलीस चौकी उपयुक्त ठरेल. येथे तीन अधिकारी, सहा कर्मचारी आणि मार्शल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.