Chinchwad News : ‘त्या’ व्हायरल बनावट पत्राची अपर पोलीस आयुक्तांकडून होणार चौकशी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर 200 कोटी रुपये वसूल केल्याच्या आरोपाचे एक बनावट पत्र मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले. यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात या पत्रावरून साधक बाधक चर्चा झाली. हे प्रकरण पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यंत गेले असता त्यांनी या व्हायरल झालेल्या पत्राची चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांना दिले आहेत.

 

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने एक पत्र व्हायरल करण्यात आले. कृष्ण प्रकाश हे पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी त्यांच्यासाठी 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा त्या पत्रात करण्यात आला. ते पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे पत्रात नमूद आहे. व्हायरल झालेल्या या पत्रात चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पत्रकारांच्या नावांचा देखील समावेश आहे.

 

व्हायरल पत्रात अर्जदार म्हणून नाव असलेले सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी आपण कोणतेही पत्र लिहिलेले नाही. कोणीतरी माझ्या नावाचा वापर करून बनावट सही करून पत्र व्हायरल केले आहे. त्याबाबत चौकशी करण्यात यावी, असा अर्ज पोलीस आयुक्तांकडे केला असल्याचे सांगितले.

 

तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, व्हायरल होत असलेले पत्र हे पूर्णतः खोटे असून केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापूर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत. अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी लोकांच्या आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे,  असेही कृष्ण प्रकाश म्हणाले.

 

यापूर्वी देखील अशा प्रकारचे एक पत्र व्हायरल झाले होते. पिंपरी चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्यासह अनेकांच्या नावाने ते पत्र लिहिण्यात आले होते. त्यातही आजवर काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर आणखी एक पत्र व्हायरल झाले आहे. या दोन्ही पत्रांचे म्होरके वेगवेगळे असल्याचे म्हटले जात आहे. तरीही या पत्रांचा कर्ताकरविता कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी दिली आहे. संजय शिंदे यांनी देखील प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.