Chinchwad News : शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगत व्यावसायिकाची 82 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे लावण्याच्या बहाण्याने सहा लाख रुपये घेतले. त्यातील 50 हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर इंडियन शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यास सांगत 76 लाख 55 हजार रुपये घेतले आणि कोणताही परतावा दिला नाही. यामध्ये तिघांनी मिळून एका व्यावसायिकाची 82 लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 ऑक्टोबर 2019 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत अक्षदा हॉटेल, लिंक रोड चिंचवड येथे घडला.

संदीप शांताराम निकम (वय 50, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित पन्नालालजी ललवाणी (रा. उरुळी कांचन), प्रवीण चिमाजी निंबाळकर (रा. धायरीगाव, सिंहगड रोड, पुणे) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित याने फिर्यादी यांना फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पैसे तुम्हाला चांगला फायदा करून देतो असे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सुरुवातीला पाच लाख रुपये आणि नंतर एक लाख रुपये असे सहा लाख रुपये घेतले. त्यातील 50 हजार रुपये परतावा आरोपींनी दिला. त्यानंतर फिर्यादी यांचा फोन उचलणे बंद केले आणि त्यांना आरोपी भेटले देखील नाहीत.

आरोपी प्रवीण आणि महिला यांनी फिर्यादी यांना इंडियन शेअर मार्केटमध्ये पैसे लावल्यास चांगले पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवले आणि प्रवीण निंबाळकर याच्या खात्यावर फिर्यादीकडून 76 लाख 55 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना परतावा दिला. यामध्ये फिर्यादी यांची एकूण 82 लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.