Chinchwad News : माथाडी कामगार कार्यालयाची इमारत घाणीच्या विळख्यात ; सभोवताली दुर्गंधी, कार्यालयाची दुरावस्था

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील माथाडी कामगार कार्यालयाची इमारत घाणीच्या विळख्यात सापडली आहे. चिंचवड मालधक्का जवळ गुलनूर बिल्डिंगमध्ये हे कार्यालय आहे. बिल्डिंगच्या खाली मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त कचरा साठला आहे. जागा मिळेल तिथे लघुशंका आणि शौच केल्याने परिसरात किळसवाणी दुर्गंधी पसरली आहे. तसेच, कार्यलयाकडे जाणा-या पाय-या, खिडक्या यांची दुरावस्था झाली आहे. इमारत दारुचा अड्डा झाला असून, दारुच्या बाटल्या आणि सिगारेट, बिडीची थोटके ठिक ठिकाणी पडले आहेत.

महावीर चौकातून चिंचवडकडे जाताना उड्डानपुलाच्या डाव्या बाजूला जुनी गुलनूर बिल्डिंग आहे. यामध्ये दुस-या मजल्यावर माथाडी कामगार कार्यालय आहे. कमर्शियल असलेल्या या इमारतीत माथाडी कामगार कार्यालय व शॉप ॲक्ट कार्यालय ही दोन कार्यालय आहेत. इमारतीच्या समोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वेगवेगळा दुर्गंधीयुक्त कचरा इमारतीसमोर साठला आहे. बंद असलेल्या गाळ्यासमोर नागरिकांनी प्लास्टिक बॉटल्स, पिशव्या, दारूच्या बाटल्या फेकलेल्या आहेत. येथेच गाळयांना लागून नागरिक खुलेआम लघुशंका करत आहेत. तळमजल्याला असलेली मुतारी तुटली असून, त्यामध्ये किळसवाणी घाण साठलेली आहे.

इमारतीत प्रवेश करताच गुटखा खाऊन पिचकारी मारलेल्या लालभडक भिंती स्वागत करतात. जीर्ण झालेल्या इमारतीच्या खिडक्या तुटून पडलेल्या आहेत. जिण्याचा काही भाग पडलेला आहे, सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बारही तुटलेले आहेत. इमारतीत बाहेरच्या गाळ्यात वीज व्यवस्था नसल्याने कार्यालय शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तसेच, इमारतीच्या बाहेर कार्यालयाचा केलेला नामोल्लेख पुसट झाला आहे. इमारतीची गच्ची दारुचा अड्डा बनला असून दारुच्या बाटल्या येथेच फेकून दिल्या आहेत तसेच अनेक बाटल्या फोडून काचा तिथेच पडलेल्या आहेत.

दरम्यान, याबाबत कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ यांनी असे सांगितले की, इमारत परिसर आणि इमारतीत स्वच्छता ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण, इमारत झोपडपट्टी भागात येत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिक अस्वच्छता करतात. तसेच इमारतीला सुरक्षारक्षक नसल्याने त्याचा गैरफायदा स्थानिक नागरिक घेतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.