Chinchwad news: सुमित ग्रुप ऑफ कंपनी सीएसआर अंतर्गत पोलिसांना देणार रुग्णवाहिका

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील सुमित ग्रुप ऑफ कंपनी सीएसआर अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोफत रुग्णवाहिका देणार आहे. तसेच सायबर क्राईमचा तपास, सुरक्षा याबाबतही डिजिटल टास्क फोर्स या कंपनीच्या मदतीने पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

चिंचवड येथील सुमित हाऊस प्लॉट नंबर 64/21, d-2 येथे उद्या (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे रुग्णवाहिकांची चावी सुपूर्द केली जाणार आहे. सायबर सेलचे डॉ. संजय तुंगार, वकील सुशील हिरे, नंदू फडके, प्रभाकर साळुंखे, संचालक ब्रिगडियर महेश इराणा (निवृत्त), रोहन न्यायाधीश उपस्थित असणार आहेत.

शहराच्या विविध भागात अपघाताच्या घटना घडतात. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदा पोलीस हजर होतात. कुठेही अपघात घडला, बेवारस मृतदेह आढळला असेल तर पोलिसांना फोन येतो. पोलिसांना तिथे जावे लागते. त्यावेळी रुग्णवाहिकेची गरज असते. पण, रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होत नाही.

पोलिसांकडे निधी देखील नसतो. पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्यानेच पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे कंपनीतर्फे पोलिसांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यासोबत प्रशिक्षित दोन चालक, इंधनाचा खर्चही कंपनीतर्फे दिला जाणार आहे. ही सुविधा चोवीस तास सुरू असणार आहे. रुग्णवाहिकेवर पोलिसांचाच संपर्क क्रमांक दिला जाईल. रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस कर्मचारी देखील असणार आहे”.

डिजिटल टास्क फोर्स या संस्थेमार्फत सायबर सुरक्षेबाबत पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस, उद्योजक, विद्यार्थी, वकील आणि न्यायाधीश यांचाही यात समावेश आहे. अनेकदा घटनास्थळी पंचनामा कसा करावा यावरून पोलिसांमध्ये संभ्रम असतो. हे प्रशिक्षण देखील पोलिसांना कुणाल प्लाझा येथे देण्यात येणार आहे.

विद्यार्थी, उद्योजकाची ऑनलाईन फसवणूक झाल्यास तक्रार कशी करायची, काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत माहिती नसते. वकिलांना देखील सायबर फसवणुकीच्या केस लढवीताना अडचणी येतात, कायद्यांची जाण नसते. याबाबतची सर्व माहिती प्रशिक्षणात देण्यात येणार असल्याचे” प्रमोद मुंगी यांनी सांगितले.

”सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. फॉरेन्सिक आणि सायबर लॉ मध्ये शिक्षण देणारी डिजिटल टास्क फोर्स (www.dtfservice.com) ही संस्था अनेक वर्षापासून कार्य करत आहे. विद्यार्थ्याना शिक्षण घेतल्यावर भरपूर करिअरच्या संधी पण उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विविध कंपन्याशी करार करण्यात आले आहे”, असे रोहन न्यायाधीश यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.