Chinchwad News : महाविकास आघाडी हे ‘तीन तिगडी काम बिगडी, पनवती आणि वसुली सरकार’ – उमा खापरे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज दोन-तीन बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री झोपेचे सोंग घेत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे ‘तीन तिगडी काम बिगडी, पनवती आणि वसुली सरकार आहे. या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांबाबत पोलीस आयुक्तांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 23) निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उमा खापरे म्हणाल्या, “महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज दोन-तीन बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे एका मुलीवर बलात्कार झाला आहे. हा प्रकार पोलिसांनी आणि डॉक्टरांनी दाबण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव वाढतोय. आरोपींना सुरक्षा दिली जात आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

उमा खापरे पुढे म्हणाल्या, “साकीनाका येथे अत्याचाराची घटना घडली. आज डोंबिवली येथे देखील एका सात वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समजले आहे. हे होतंय याच कारण आहे की, या गुन्ह्यातील नराधमांना शिक्षा दिली जात नाही. या गुन्हेगारांना फास्टट्रॅक न्यायालयात शिक्षा दिल्यास हे रोखता येईल. आम्ही वारंवार शक्ती कायद्याची मागणी करत आहोत. भाजपच्या आमदारांनी राज्यपालांकडे याबाबत निवेदन दिले आहे. राज्यपालांनी ते निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. आता मुख्यमंत्री केंद्राकडे बोट दाखवत आहेत.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झोपेचं सोंग घेत आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये गृहमंत्री आजपर्यंत माध्यमांसमोर का आले नाहीत. महाविकास आघाडी सरकार हे तीन तिगडी, काम बिगडी सरकार आहे. हे पनवती सरकार आहे. वसुली सरकार आहे. या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात महिला मोर्चाचे गप्प बसणार नाही. महिलांवरील अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे, अशी मागणी महिला प्रदेशच्या वतीने केली असल्याचे खापरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.