Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सोमवारी 138 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 4) 138 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.

सोमवार पासून देशभरात लॉकडाऊन 3.0 ला सुरुवात झाली आहे. हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी (4 ते 17 मे) लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांच्या अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यावर बंधने आली आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात 21 भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. हे परिसर पूर्णतः सील करून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. अशी परिस्थिती असताना नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. ही बाब दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. पोलीस देखील न कंटाळता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

सोमवारी शासनाने कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. यामुळे तळीरामांना काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी शहरात ठिकठिकाणी तळीरामांच्या रांगा आढळून आल्या. लॉकडाऊनच्या काळात घडलेला मदिरेचा उपवास आता सुटणार या आशेने हे तळीराम दारूच्या दुकानांसमोर सकाळपासूनच घिरट्या घालत होते.

काही ठिकाणी नियमात राहून दारूची खरेदी-विक्री झाली. पण काही ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून तळीरामांनी सोशल डिस्टन्स राखण्याला हरताळ फासला. त्यामुळे पोलिसांना अशी दुकाने बंद करावी लागली.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (10), पिंपरी (8), चिंचवड (18), निगडी (14), आळंदी (8), चाकण (11), दिघी (4), सांगवी (6), वाकड (6), हिंजवडी (18), देहूरोड (11), तळेगाव दाभाडे (6), चिखली (16), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (1) एकूण 138 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.