Pune : भवानी पेठेतील कोरोनबाधितांची संख्या चारशेपार, शहरातील रुग्णांचा आकडा 1890

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. एकट्या भवानी पेठेतील कोरोना रुग्णांची संख्या 416वर जाऊन पोहोचली आहे. अत्यंत कडक उपाययोजना करूनही या रोगाचे रुग्ण काही कमी होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक हॉटस्पॉट समाजल्या जाणाऱ्या भवानी पेठेत 416, ढोले पाटील 314, शिवाजीनगर-घोलेरोड 242, तर येरवडा – कळस – धानोरी भागांत 214, कसबा – विश्रामबागवाडा परिसरात 169 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या भागांत दाटीवाटीने नागरिकांचे वास्तव्य आहे. सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे, यासाठी लोकांना महापालिकेच्या शाळा, मंगल कार्यालय, वसतिगृहात राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी लोकांनी राहायला जावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

शहरातील धनकवडी – सहकारनगर 124, वानवडी – रामटेकडी 96, बिबवेवाडी 61, हडपसर – मुंढवा 56, नगररोड – वडगावशेरी 55, कोंढवा – येवलेवाडी 30, सिंहगड रोड 14, वारजे – कर्वेनगर 10, औंध – बाणेर 4, कोथरूड – बावधन 4, पुणे शहरा बाहेरील 68 असे एकूण पुणे शहरात 1890 कोरोनाचे रुग्ण आहेत.

कोरोनाचा सर्वाधिक हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठ, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यलयाची जबाबदारी सहकार आयुक्त सौरभ राव यांच्याकडे, कसबा – विश्रामबागवाडा, कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यलयाची जबाबदारी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिनदर प्रतापसिंग यांच्याकडे शिवजीनगर क्षेत्रीय कार्यलय, तर येरवडा – कळस – धानोरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

तसे स्पष्ट आदेशच महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बजावले आहे. त्यामुळे कोरोनाचे वाढते रुग्ण कमी करणे या अधिकाऱ्यांसमोर आव्हानात्मक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.