Pimpri: शहरात 17 मे पर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करा -नाना काटे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरासह राज्यात लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढण्यात आला आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणू संक्रमणशील क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) वगळता शहराच्या इतर भागामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय महापालिका व पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून नागरीकांनी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत आहे. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे 17 मे पर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, नागरीक दुकानांबाहेर मास्क लावून सकाळपासून गर्दी करुन उभे राहिलेले दिसून आले. तर काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे नियमही पायदळी तुडवित असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी नाईलाजाने पोलिसाना लाठीचार्जही करावा लागला.

एकीकडे मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे संचारबंदी शिथिल करुन कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढीसाठी प्रोत्साहनच देत आहे, हा विरोधाभासच नव्हे का ?

वास्तविक पाहता गेली दिड दोन महिन्यांपासून जे नागरीक प्रामाणिकपणे संचारबंदीचे तसेच मनपा पोलिस प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सर्व प्रकारची काळजी घेऊन घरी बसले आहेत. या संचारबंदी शिथिलतेमुळे नागरीकांनी रस्त्यावर, दुकानात गर्दी करुन कोरोना बाधितांचे रुग्ण वाढल्यास या प्रामाणिक नागरीकांवर अन्याय केल्यासारखे होणार आहे.

तसेच पोलिस प्रशासन व मपाचे संचारबंदी शिथिलतेचे आदेशांमध्ये तफावत असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. त्यामुळे गोंधळाचेवातावरण निर्माण होऊन नागरीक रस्त्यावर, दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे संचारबंदीमध्ये कडक नियमाची अंमलबजावणी करण्यात आली त्याचप्रमाणे 17 मे पर्यंत शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.