Chinchwad : सुरक्षित पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘वॉचर पॅटर्न’

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यात चोऱ्यामाऱ्या, छेडछाड करणाऱ्यांवर (Chinchwad) निगराणी ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यावर्षी ‘वॉचर पॅटर्न’ राबवला आहे. यापूर्वी पालखी सोहळ्यात ज्या भागातील गुन्हेगारांनी गुन्हे केले आहेत, त्या भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली असून त्या पथकांकडून आपापल्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवली जाणार आहे.

मागील वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बीड, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, पिंपरी-चिंचवड, पुणे या भागातील चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे प्रकार केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. काहींना रंगेहाथ पकडले तर काहींची ओळख पटवून त्यांच्या गावातून ताब्यात घेण्यात आले. यावर्षी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या गुन्हेगारांवर संबंधित शहरातील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तसेच मागील वर्षी ज्या भागातील गुन्हेगारांनी पालखी सोहळ्यात गुन्हे केले त्या भागातील अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके पालखी सोहळ्यासाठी मागवण्यात आली आहेत. ही पथके आपापल्या हद्दीतील (Chinchwad) रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉचर’ बनून नजर ठेवणार आहेत.

Pimpri : द्वेष, सुडाच्या राजकारण काळात ‘लोक माझे सांगाती’ मार्गदर्शक – काशिनाथ नखाते

मागील वर्षी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थेट वारकऱ्यांची वेशभूषा करून पालखीत सहभाग घेतला होता. काही पोलीस साध्या वेशात होते. त्याच प्रमाणे यावर्षी देखील काही अधिकारी आणि कर्मचारी वारकऱ्यांच्या व साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून पालखी सोहळ्याची सुरक्षा राखणार आहेत. सर्व्हेलन्स व्हॅन, ड्रोन, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, व्हिडीओग्राफी आदींच्या माध्यमातून पोलिसांची वारीवर करडी नजर असणार आहे.

पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. दर्शन घेण्याच्या घाईत अनेकांना आपल्या दागिन्यांचे भान राहत नाही. याचाच फायदा घेऊन चोरटे अलगद दागिने चोरून नेतात. मागील वर्षी असे अनेक प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे यावर्षी पालखीला देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.