Chinchwad : पाऊस, अज्ञान आणि गिरीभ्रमंती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रुपाने खूप विलोभनीय, (Chinchwad) वैशिष्ट्यपूर्ण निसर्गाचे अलौकिक वैभव लाभलेले आहे. पावसाळा आला की सह्याद्रीच्या या गहिऱ्या निसर्गात जाण्याची अनेकांना ओढ लागते. पावसाची एकेक सर अंगावर घेत हिरवाईने नटलेल्या लाल मातीच्या पायवाटा तुडवाव्यात असे वाटू लागते.

कोणाही स्वच्छंदी मनाला असे वाटणे हे स्वाभाविक आहे. निसर्गाच्या विविध छटा अनुभवण्याचा आनंद घेणे हे नक्कीच उत्साहवर्धक आहे. माणसाला निसर्गाची ओढ, आवड असू शकते, मात्र त्याचवेळी काही मर्यादा आणि शिस्तीचे तारतम्य राखणेही आवश्यक असते. याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील ट्रेकर अरुण बोऱ्हाडे यांनी माहिती दिली.

दोन दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगडावर गेलेल्या पाच जणांचे झालेले हाल, (Chinchwad) त्यातील एकावर ओढवलेला दुर्दैवी मृत्यू आणि आनंदाचे भरते येण्याऐवजी दुःखाच्या खाईत जाण्याची आलेली अत्यंत दुःखद वेळ खूप काही शिकवून जाते. ही घटना पावसाळी भटकंतीच्या अज्ञानातून घडलेली आहे.

मुळात गिरीभ्रमंती, भटकंती किंवा ट्रेकिंग हे काही एखाद्या बागेत फिरायला जाण्यासारखे सहजसोपे नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भटकंतीचा आनंद लुटण्यापूर्वी आपण थोडाफार भौगोलिक अभ्यास करायला हवा.

शरीराला चालण्याची सवय असावी. निसर्गातील पाऊस, थंडी, उन, वारा सोसण्या इतपत तरी आपली शारीरिक क्षमता असावी. वेळच आली तर दुसऱ्याला मदतीचा हात देण्याची तयारी असावी.

सर्वात मोलाचे, आपण जिकडे भ्रमंतीला जाणार आहोत, तेथील माहितगार व्यक्ती आपल्या बरोबर असावी. पुरेसे अन्न, पाणी, पांघरून, आवश्यक औषधे, विजेरी इत्यादी चीजवस्तू बरोबर असाव्यात.

मात्र हल्ली समाजमाध्यमांतून येणाऱ्या अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रत्येकजण उठतो नि कोणतीही पूर्वतयारी न करता कुठेही भटकंतीला निघतो. व्हॉटसअॕप वरील रिल्स व्हिडीओज किंवा माहिती ही परिपूर्ण व सखोल असतेच असे नाही.

किंबहूना गुगलद्वारे दाखविण्यात येणारे नकाशे, वाटाही चुकण्याचा संभव असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. डोंगरदऱ्या, रानवाटा, घाटवाटा, जंगली पायवाटा तुडवीत जाणे, समजतो तेवढे सोपे नसते. शहरी जीवनात कधीही चालायची सवय नसलेले पाय, या मैलोनमैल रानवाटा तुडविताना कुरकुरणारच ! काहीजण तर पाठपिशवी (सॅक) घ्यायलाही नको म्हणतात ! चालण्याची सवय नसणाऱ्या आणि पाठीवरती ओझे नको असणाऱ्या मंडळींनी या सह्याद्रीतील भटकंतीला जावूच नये.

हल्ली अनेक दुर्गम गावांपर्यंत रस्ते आणि वाहनांची सोय झाली आहे. (Chinchwad) त्यामुळे मनात आले की गाडी काढून हवे तिथे पोहचता येते. त्याच गावात चहानाष्टा करतात. पण गावातील हॉटेलमध्ये मनसोक्त खाऊन, गमजा मारीत डोंगर चढाई कशी वेळेत होणार? त्यापेक्षा घरची पौष्टिक शिदोरी डोंगर वाटेत चालून थकल्यावर ती खाण्याची मजा लुटावी.

भटकंती करताना भरपेट खाण्याऐवजी दोन घास कमी खावेत. पोटातील पाण्याचा पिंप वारंवार भरू नये. गिरीभ्रमंती करताना अशी बरीचशी पथ्ये पाळावी लागतात.

खरे तर जुलै ऑगस्टच्या भर पावसात अशी भटकंती नवख्यांनी कधीही करू नये. कुठे दरडी कोसळतात, कुठे ओढेनाले तुडुंब भरून वाहतात. कधी जुने झालेले वृक्ष उन्मळून पडतात, तर कधी रस्ते, पुल वाहून जातात.

Chikhali : कर्नाटकमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखलीतून सात जणांचे अपहरण

त्यावर मात करून पुढे गेल्यावरही डोंगरवाटा चढताना पावसामुळे ओलसर व निसरड्या झालेल्या आणि काही ठिकाणी खडक शेवाळल्यामुळे घसरड्या झालेल्या असतात. असे नानाविध प्रसंग अनुभवास येतात.

अशा प्रसंगी खूप प्रसंगावधान राखून, धीराने आणि हुशारीने परिस्थिती हाताळावी लागते. यासाठी अनुभवी आणि धैर्यशील माणसं बरोबर असावीत. गिरिभ्रमंती हा धैर्याचा, धाडसाचा, चापल्य, सावधगिरी, साहचर्य आणि सहकार्याचा छंद आहे.

यापैकी कशाचाही कुठलाही विचार न करता हल्ली केवळ मोबाईल फोटो आणि रिल्स किंवा व्हिडिओ क्लिप्स काढण्यासाठी काही अतिउत्साही लोक कोणतीही पूर्वतयारी न करता, अर्धवट माहिती आणि अपुरी साधने घेऊन भ्रमंतीला निघतात, हे टाळले पाहिजे. अन्यथा हरिश्चंद्रगडावर घडल्या तशाच घटना प्रतिवर्षी कुठे ना कुठे घडतात.

या भटकंतीच्या छंदात स्वयंशिस्त आणि संयम महत्वाचा असतो. निसर्गात मस्ती, बेशिस्त आणि बेपर्वाई चालत नाही. निसर्गातील निखळ आनंद घ्यायचा असेल तर वर उल्लेख केलेली पथ्ये पाळलीच पाहिजेत.

पर्यटन आणि गिरीभ्रमंती किंवा भटकंती या संपूर्णपणे वेगवेगळ्या बाबी आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. अनेक लहानमोठ्या शहरात गिर्यारोहण संस्था अर्थात ट्रेकिंग क्लब आहेत. नवख्या मंडळींनी अशा क्लबच्या माध्यमातून भटकंतीला जावे.

अनुभवाची शिदोरी नेहमीच उपयोगी पडते. भटकंतीतील नियम व सूचना पाळाव्यात. त्यामुळे परवा हरिश्चंद्रगडावर घडलेली किंवा यापूर्वी अन्य ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटना टाळता येतील. अखेरीस आपले जीवन सुंदर आहे. निसर्ग अप्रतिम आहे.

जीवनातील आनंद फुलवायचा असेल तर निसर्गात भटकंती करण्यासाठी थोडा अभ्यास, शिस्त, सराव आणि शारीरिक क्षमता याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

-ट्रेकर अरुण बोऱ्हाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.