Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानचे स्वयंसेवक ठेवणार विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्था, संघटना, महिला बचत गट आणि नागरिकांना एकत्रित घेऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219 स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. यामध्ये विविध महिला बचत गट, महाविद्यालय आणि कार्यकर्ते सभागी झाले आहेत.

संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण अकरा दिवस चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो स्वयंसेवक नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असतात. दुपारी चार ते रात्री दहा पर्यंत स्वयंसेवक वाहतूक बंदोबस्त, विसर्जन घाटावर आणि जीवरक्षक म्हणून कार्य करतात. यामुळे पोलीस, महापालिका आणि अग्निशमन विभागाला याची मोठी मदत होते. यावर्षी 150 स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत काम करणार आहेत.

यावर्षी महिला बचाव गटाचे 135 सभासद आणि डॉ वाय पाटील फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवा योजना विभागाचे 80 विद्यार्थी या मोहिमेत सहभाग घेणार आहेत. चापेकर चौकापासून ते थेरगाव पूल, बिर्ला हॉस्पिटल रोडवरील घाट, मोरया गोसावी मंदिर घाटापर्यंत स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. चिंचवड स्टेशन चौक ते चापेकर चौक या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी देखील स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. तर चार स्वयंसेवक चिंचवड घाटावर जीवरक्षक म्हणून काम करणार आहेत.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, चिंंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.