Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील 440 पोलिसांची कोरोना चाचणी; सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहर पोलिसात आनंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 440 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 32 अधिकारी आणि 408 कर्मचारी यांचा समावेश आहे. चाचणी केलेल्या सर्व पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहर पोलिसात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पोलीस बांधवांच्या कुटुंबियांसाठी पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत शहरातील चार रुग्णालयांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करीत आहेत. पोलिसांना कोरोनाचा लागण होऊ नये, तसेच त्यांच्या तपासणीसाठी पोलीस आयुक्तांनी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे.

यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व वयोगटातील मधुमेह, रक्तदाब, किडनी रोग, हृदयरोग व इतर गंभीर आजार असलेले पोलीस. तसेच 50 वर्षांवरील परंतु कोणतेही आजार नसलेले सर्व पोलीस अशी वर्गवारी करून पोलिसांची तपासणी करण्यात येत आहे.

ज्या पोलिसांना स्वतःहून तपासणी करायची आहे, अशा सर्व पोलिसांना मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांच्या जवळच्या (रक्ताच्या) नातेवाईकांनाही पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणत्या रुग्णालयात मिळणार कोणत्या सुविधा –
# आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, थेरगाव चिंचवड
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोव्हीड 19 चा संसर्ग झाल्यास त्यांच्यावर उपचाराची सोय या रुग्णालयात करण्यात आली आहे.

# स्टर्लिंग हॉस्पिटल, प्राधिकरण निगडी
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत वैद्यकीय सुविधा
तसेच या रुग्णालयात मेट्रोपोलिस लॅब यांच्यातर्फे मोफत स्क्रिनिंग व कोव्हीड19 ची वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

# लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोव्हीड 19 चा संसर्ग झाल्यास त्यांच्यावर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

# लोकमान्य हॉस्पिटल, निगडी
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोव्हीड 19 चा संसर्ग झाल्यास त्यांच्यावर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

# डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत इतर आजारांची (नॉन कोव्हीड) वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी चार रुग्णालयांत वैद्यकीय सुविधा
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नव्याने सुरू झाले असल्याने अद्याप आयुक्तालयातील पोलिसांसाठी पोलीस हॉस्पिटल सुरू करण्यात आलेले नाही. तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटल समाविष्ट करण्यात आलेली नव्हती. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दोन दिवसात शहरातील डी वाय हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल निगडी, स्टर्लिंग हॉस्पिटल निगडी या चार हॉस्पिटलला मान्यता दिली आहे. यामुळे या चार हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या नातेवाईकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

पुण्यात राहणाऱ्या पोलिसांसाठी पिंपरी चिंचवड मधील हॉटेल्समध्ये व्यवस्था
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले मात्र पुणे शहरात वास्तव्यास असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. पुणे शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड मधील पोलिसांची राहण्याची सोय शहरातील 42 हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. एकूण 412 रूम पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अहोरात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क, कापडी मास्क, युज अँड थ्रो मास्क, फेस शिल्ड, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, पीपीई किट, इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर, ऑक्सिमिटर आदी साधने पुरविण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.