Chinchwad : शहर पोलीस दलात दोन नवीन अधिकारी दाखल

सिम्बा' करणार गुन्हे प्रकटीकरणासाठी मदत तर घातक कारवायांवर 'जेम्स' ठरणार भारी ; तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शहर पोलीस दलात दाखल झाले 'सिम्बा' आणि 'जेम्स' श्वान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहर पोलीस दलात नुकताच दोन नवीन अधिकाऱ्यांचा समावेश झाला आहे. ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’ अशी या दोन नवीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्तालयाला सुरु होऊन पाच वर्ष उलटल्यानंतर अखेर या अधिकाऱ्यांची नेमणूक शहर पोलीस दलात झाली आहे.

Somatne : सोमाटणे फाटा येथील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. 15 ऑगस्ट 2018 रोजी ते कार्यान्वित देखील झाले. पोलीस आयुक्तालयाला पाच वर्ष उलटून गेली तरी देखील आयुक्तालय अद्याप अनेक बाबींसाठी धडपडत आहे. वरिष्ठ पातळीवर यासाठी पाठपुरावा सुरु असून एका पाठपुराव्याला नुकतेच यश आले आहे. श्वान पथकाच्या निमित्ताने दोन श्वान अधिकारी शहर पोलीस दलात दाखल झाले आहेत.

‘सिम्बा’ हा श्वान गुन्ह्यांशी निगडीत काम करणार आहे. चोरी, घरफोडी, खून यांसारख्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन आरोपींचा माग काढणे, हे त्याचे मुख्य काम असणार आहे. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी सिम्बा कटिबद्ध आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन हॅँडलर आहेत. प्रत्येक हॅँडलर सिम्बाची 12-12 तास काळजी घेईल.

‘जेम्स’ हा श्वान बॉम्ब शोधक नाशक पथकात (बीडीडीएस) काम करणार आहे. त्याच्या सोबत देखील दोन हॅँडलर आहेत. सिम्बा प्रमाणेच प्रत्येक हॅँडलर त्याची 12-12 तास काळजी घेईल. त्यांचे डाएट, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे हॅँडलर घेणार आहेत.

पोलीस दलात असणाऱ्या श्वानांना सुरुवातीपासून जो हॅँडलर सांभाळतो, त्याचेच ते ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात तिथे त्यांचे हॅँडलर सावलीप्रमाणे सोबत असतात.

 

पिंपरी-चिंचवड पोलिसांना अनेक गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांच्या श्वान पथकाची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी देखील अनेकदा निर्माण झाल्या होत्या. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात नवीन दोन श्वान दाखल झाल्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.