Chinchwad : वाहन चोरांना अटक, आठ मोटारसायकल जप्त; चिंचवड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलीस कर्मचा-याने पकडल्याने दुचाकीस्वराने चौकातच गाडी लावली अन् निघून गेला. गाडीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे समजले. त्यानंतर दुचाकीस्वाराला पकडून कसून चौकशी करत त्याच्या एका साथीदारासह आठ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी केली.

अंकुश बालाजी क्षीरसागर (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. परभणी), प्रदीप संजय माळी (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मारुती फलके चिंचवडमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी अंकुश एका दुचाकीवरून (एम एच 14 / ई व्ही 4334) येत होता. त्याचा संशय आल्याने फलके यांनी दुचाकी अडवली आणि कागदपत्रांबाबत चौकशी केली. ती दुचाकी आपल्या रूमवरील मित्राची आहे. गाडीची कागदपत्रे त्याच्याकडे आहेत. कागदपत्रे घेऊन येतो आणि दाखवतो, असे सांगून अंकुशने महावीर चौकातून धूम ठोकली. संध्याकाळपर्यंत वाट पाहिल्यानंतर पोलिसांनी ती दुचाकी चिंचवड पोलीस ठाण्यात आणली.

पोलीस हवालदार फलके यांनी याबाबत चिंचवड पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसाना गाडीच्या पेट्रोलच्या टाकीच्या कव्हरमधून अंकुशचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मिळाली. त्यावरून त्याच्या वाकड येथील घरातून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने ती दुचाकी त्याचा कोल्हापूर येथील मित्र प्रदीप याच्यासोबत मिळून चिंचवडमधून चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रदीपला देखील ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघांनी चिंचवड, भोसरी, हिंजवडी परिसरातून आठ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. दोघांकडून 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या.

या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. (एम एच 14 – एफ झेड 1346 / एम एच 14 – बी झेड 1383 / एम एच 14 – जी जे 2684 आणि एम एच 03 / सी जे 3291) या चार मोटारसायकलच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमरव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, मारुती फलके, सुधाकर अवताडे, स्वप्नील शेलार, ऋषिकेश पाटील, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने केली.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या टँकर पॉईंटवर खासगी टँकरला नागरिकांसाठी वापराचे पाणी उपलब्ध करून देणे व त्यांच्याकडून प्रति टँकर 200 रुपये शुल्क घेण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.