Cinet Election: उपमुख्यमंत्र्यांच्या भावासाठी संतोष ढोरे यांचा बळी?

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभा (Cinet Election) निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस हे 4 हजार 447 मते घेवून निवडून आले. पण, त्यांच्या पॅनलमधीलच पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव उमेदवार संतोष ढोरे यांना अवघी 1800 मते मिळाली. त्यामुळे भाजपनेच ढोरे यांचा पराभव घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीस यांना पसंती क्रमांक एक देत मागील वेळी सर्वाधिक मते घेत निवडून आलेल्या ढोरे यांचा यंदाच्या निवडणुकीत ‘गेम’ केल्याचे मतांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसते.

सिनेट निवडणुकीत यंदा राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. राज्यातील राजकारणाचे पडसाद येथेही उमटल्याने महाविकास आघाडी तसेच भाजपने जोर लावला होता. नऊ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर, एका जागी खुल्या गटातून शिवसेनेचे (ठाकरे गट ) उमेदवार बाकेराव बस्ते विजयी झाले. भाजप आणि अभाविप प्रणित ‘विद्यापीठ विकास मंच’कडून पिंपरी-चिंचवड शहरातील संतोष ढोरे निवडणूक रिंगणात होते. पॅनेलमधील केवळ ढोरे यांचा एकट्याचाच पराभव झाला. ढोरे मागील दहा वर्षे सिनेट सदस्य होते. राष्ट्रवादीकडून एक आणि भाजपकडून एकदा असे दहा वर्षे त्यांनी सिनेटमध्ये प्रतिनिधीत्व केले. मागीलवेळी सर्वाधिक मते घेत ढोरे निवडून आले होते. पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर उषा ढोरे यांचे संतोष नातलग आहेत. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक अशी ढोरे यांची ओळख आहे.

भाजप आणि अभाविप प्रणित ‘विद्यापीठ विकास मंच’कडून खुल्या (Cinet Election) प्रवर्गातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस आणि संतोष ढोरे निवडणूक रिंगणात होते. पिंपरी-चिंचवड शहरातील बुथवर ढोरे यांना मतांच्या पसंतीचा पहिला क्रमांक देण्याची रणनिती ठरली होती. तर, फडणवीस यांना पुणे शहर, पुणे जिल्ह्यातील मतांचा पहिल्या पसंतीचा कोटा दिला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातही प्रसेनजीत फडणवीस पहिला पसंती क्रमांकाचे उमेदवार ठरल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.

Pune News : बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावाला निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. साम-दाम-दंडद-भेड नितीचा अवलंबही केला. मात्र, त्यांच्या या राजकारणामुळेच ढोरे यांचा बळी गेल्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घालत सर्व लोकप्रतिनिधींशी स्वत:हून संवाद साधला. प्रसेनजीतच्या निवडीसाठी विणवण्या केल्या. त्याची परिणीती म्हणून मागच्या सिनेट निवडणुकीत काटावर निवडून आलेल्या प्रसेनजीत यांनी यंदा सर्वाधिक मते घेत बाजी मारली.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अहमदरनगर जिल्ह्यातून फडणवीस (Cinet Election) यांना अडीच हजार मते मिळाल्याचे आकडेवारीवरुन दिसते. सर्वच बुथवर केवळ प्रसेनजीत फडणवीस यांचेच नाव चालविल्याचे सांगितले जाते. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नेत्यांनीही फडणवीस यांचेच काम केल्याचे उघडपणे बोलले जात आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते फडणवीस यांच्यासाठी झटत होते. पुण्यासह नगर, नाशिक जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही प्रसेनजीत फडणवीस यांनाच मदत केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच प्रसेनजीत यांना 4 हजार 447 मते पडली. तर, त्यांच्याच पॅनलमधील संतोष ढोरे यांना अवघी 1800 मते मिळाली. हा मतांचा फरकच सर्व काही स्पष्ट करत आहे. राजकारणातूनच ढोरे यांचा पराभव झाल्याचे दिसते. शहरातील पक्षातील लोकांनीच गेम करत ढोरे यांचा पराभव घडवून आणल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.