Pune News : सॅलिसबरी पार्कसाठी नागरिकांची कार रॅली आणि दिया जलाओ आंदोलन

एमपीसी न्यूज – सॅलिसबरी पार्क येथे असलेल्या महापालिकेच्या उद्यानाला स्थानिक नगरसेवकाच्या वडिलांच्या नावाचा फलक लावण्यात आला. या उद्यानासाठी स्थानिक नागरिक मागील 40 वर्षांपासून लढा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत नागरिकांनी लढाई लढली आहे. त्यात उद्यानांना महापुरुष आणि राष्ट्रीय नेत्यांशिवाय कोणाचेही नाव न देण्याचा शासन आदेश असतानाही स्थानिक नगरसेवकाच्या वडिलांचे नाव दिले गेल्याने सॅलिसबरी पार्क परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

सॅलिसबरी पार्क रेसिडेंटस् फोरमच्या माध्यमातून शनिवारी (दि. 9) सायंकाळी कार रॅली काढण्यात आली. डॉ. व्ही पी तनेजा आणि गोपेश मेहता यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. सॅलिसबरी पार्कचा आजवरचा लढा एन पी भोग, व्ही पी तनेजा, गोपेश मेहता, प्रकाश कर्दळे, डी आर ब्रिगेन्झा, डॉ. फिलिप्स, डॉ. कपाडिया आदींनी लढला आहे. स्थानिक पातळीवरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सॅलिसबरी पार्कला वाचवण्यासाठी नागरिकांनी योगदान दिले आहे. हा लढा तब्बल 40 वर्ष सुरु होता.

दरम्यान, महापालिका उद्यानाला भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले. प्रशासकीय राजवट सुरु होण्याच्या आदल्या रात्री 13 मार्च रोजी हा बदल करण्यात आला. या नामांतराला स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून नागरिक याबाबत आंदोलन करीत आहेत. तसेच महापालिका प्रशासन, शहर विकास विभाग, राज्याचे विरोधी पक्षनेते, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत सॅलिसबरी पार्क मधील नागरिक पत्रव्यवहार करीत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून हे आंदोलन पुन्हा सुरु झाले आहे.

शनिवारी नागरिकांनी कार रॅली काढली. त्यानंतर दिया जलाओ आंदोलन केले. या आंदोलनासाठी उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी परवानगी नाकारली. दिया जलाओ हे आंदोलन उद्यानात करणे गैर असल्याचे घोरपडे यांनी सांगितले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख म्हणाल्या. त्यानंतरही नागरिकांनी हे आंदोलन करून विरोध दर्शवला. उद्यानाचे प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांनी बंद केल्याने नागरिकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने उद्यानाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांच्या नावाने लावण्यात आलेला फलक काढेपर्यंत हे आंदोलन केले जाणार असल्याचे सॅलिसबरी पार्क रेसिडेंटस् फोरमचे म्हणणे आहे.

रविवारी (दि. 10) याबाबत सॅलिसबरी पार्क रेसिडेंटस् फोरमची एक बैठक होणार आहे. शनिवारी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकाराबाबत नागरिक गुन्हा दाखल करणार असून या चळवळीची पुढील दिशा रविवारच्या बैठकीत ठरवली जाणार असल्याचेही विनिता देशमुख यांनी सांगितले.

असा आहे सॅलिसबरी पार्कचा लढा –

सन 2000 साली सर्व सार्वजनिक उद्यानांना राष्ट्रीय व्यक्ती, मोठे पर्यावरण तज्ज्ञ यांचीच नावे देण्याचा जीआर काढण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक व्यक्तींची नावे उद्यानाला दिली जात नव्हती. तत्पूर्वी सन 1990 मध्ये सॅलिसबरी उद्यानाचा प्लॉट पुणे महापालिकेने एका बांधकाम व्यावसायिकाला दिला. त्यानंतर वर्तमानपत्रातून आणि नागरिकांनी याचा विरोध केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. 20 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. पुणे महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, संबंधित जागा ही उद्यानासाठी वापरा. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नुकसान भरपाई द्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 70 हजार चौरस फूट असलेला प्लॉट गार्डनसाठी आरक्षित झाला. सॅलिसबरी पार्क येथे महापालिकेचे एक उद्यान आहे. त्याची निर्मिती आणि देखभाल सायरस पूनावाला यांनी स्वखर्चाने केली. त्याची देखभाल अजूनही पूनावाला हेच करीत आहेत. दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांनी या उद्यानाची देखभाल करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी भिमाले यांच्यासोबत बैठक घेऊन सांगितले की, हा उद्यानाचा मुद्दा मागील 40 वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे या उद्यानाला खाजगी व्यक्तीचे नाव द्यायचे नाही. त्यावर भिमाले यांनी उद्यानाला कुणाचेही नाव न देण्याबाबत नागरिकांना होकार दर्शवला.

25 नोव्हेंबर 2021 रोजी या उद्यानाचे उदघाटन झाले. त्यावेळी त्या उद्यानाचे नाव ‘पुणे महापालिका उद्यान’ असे होते. 13 मार्च 2022 रोजी पालिकेचा कार्यकाळ संपला. 14 मार्च पासून प्रशासकीय राजवट सुरु होणार होती. दरम्यान 13 मार्चच्या रात्री भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने ‘स्व. प्रा. यशवंतराव भीमाले उद्यान’ असा फलक उद्यानाला लावला. सन 2020 साली महापालिकेकडून एक ठराव पास केला. हे उद्यान माजी नगरसेवक भिमाले यांच्या वडिलांच्या नावे होणार असल्याचे त्या ठरावात संमत करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक भिमाले यांनी नागरिकांना सांगितले. मात्र ही बाब भिमाले यांनी नागरिकांपासून लपवून ठेवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.