Ram Raksha Stotra : `रामरक्षा` स्तोत्र-मंत्र आणि कवच

एमपीसी न्यूज (डॉ. राजीव नगरकर, रामरक्षेचे उपासक आणि अभ्यासक ) : राम हे दोन शब्द उच्चारले तरी मनाला शांतता, प्रसन्नता, उर्जा, उत्साह, समाधान मिळते. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे नवीन वर्षाच्या नवव्या दिवशी म्हणजेच आज प्रभू श्री रामचंद्र रघुकुळात प्रकट झाले. त्यांच्या पराक्रमाची गाथा आपल्या सर्वांना माहित आहेच. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वांचे रक्षण करावे, यासाठी बुधकौशिक ऋषी यांनी जी रचना केली आहे. ती म्हणजे `रामरक्षा`.  श्रीरामांच्या जन्मदिनानिमित्त रामरक्षेचे महत्त्व सांगणारा हा लेख.

रामरक्षा हे स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे ज्यामध्ये स्तुती केली जाते ते स्तोत्र होय. रामरक्षेच्या सुरवातीलाच,  `अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मन्त्रस्य `, असे म्हटले आहे. रामरक्षा हे स्तोत्र तर आहेच पण ते मंत्र सुद्धा आहे. आपल्याकडील ऋषी, मुनी हे मंत्र द्रष्टे होते. त्यांना ते मंत्र दिसले त्यांनी ते पाहिले आणि लिहिले. मंत्र हे अपौरुष्य असतात. रामरक्षा हा मंत्र विश्वामित्रांच्या कुळातील बुधकौशिक ऋषी यांनी लिहिले. त्यंना हे म्ंत्र स्वप्नात भगवान शंकरांनी त्यांना सांगितले.

`आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमां हरः`

मंत्र म्हणजे मननांत त्यराते इति मन्त्राः

या स्तोत्रामधील एक एक अक्षर महापातकाचा नाश करते – एकैकमक्षरं पुसां महापातकनाशनम् || कारण ह्या मंत्राचे आराध्य दैवत कोण आहेत तर श्री सीताराम देवतः सीता म्हणजे साक्षात शक्ती आणि पराशांती आहेत. तर प्रभू रामचंद्र हे परमात्मा होय. ह्या स्तोत्रामधील फार महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली आहे. ती म्हणजे, “श्रीमद हनुमान कीलकं“

रामरक्षा जर आपल्यासाठी प्रभावी करायची असेल तर त्याची किल्ली पयम स्तोत्रात दिली आहे. ती म्हणजे `महारूद्र हनुमान`. हनुमानाची उपासना आणि रामरक्षा असे सोबत म्हणण्याची पद्धत आहे. श्रीराम पर्यंत पोचण्यासाठी आधी रामाच्या दूतापर्यंत पोचणे आवश्यक आहे.

या संपूर्ण स्तोत्राची रचना ही अनुष्टुप छंदात केली आहे. पृथ्वीतलावर सर्वांत पहिले निर्माण झालेला छंद म्हणजे अनुष्टुप छंद. वाल्मिकी ऋषींनी संपूर्ण रामकथा ही याच छंदात सांगितली आहे. अनुष्टुप छंदामध्ये एकूण ३२ वर्ण असतात. ते चार पदांमध्ये विभागलेले असतात. प्रत्येत छंद हा ८ वर्षांचा असतो. या छंदाची निवड रारक्षेसाठी करण्यात आली आहे.

रामरक्षा हे कवच देखील आहे. आपले रक्षण रामाने करावे, यासाठी रामरक्षेच्या चैथ्या श्लोकापासून आपल्या शरीराच्या एकेक अवयवाचे रक्षण रामाने कसे करावे, याबद्दल वर्णन केले आहे.

माझ्या शिराचे रक्षण राघवाने करावे, कारण तो कुळाचा परंपरा जपणारा आहे, कपाळाचे रक्षण, दशरथात्मजः म्हणजे दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचे म्हणजेच माझ्या भाग्याचे रक्षण करावे. माझ्या डोळ्याचे रक्षण कौसल्येचा पुत्र म्हणजे रामाने करावे, पाहणे आणि दृष्टी असणे यात फरक आहे. त्यामुळे कौसल्या जी कुशल होती तिचा आशिर्वाद लाभलेला तिचा पुत्र राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो.

माझ्या कानाचे रक्षण विश्वामित्रांनी करावे कारण कसे ऐकावे हे फार महत्वाचे आहे. श्रवणाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात, `श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ`.

माझ्या नाकाचे आणि `मखत्राता मुखं` म्हणजे माझ्या मुखाचे म्हणजे केवळ ऐकणे बोलणे नसून संपूर्ण चेहेरा. आपले व्यक्तिमत्व आपल्या चेहेऱ्यावर अवलंबून असते, त्याचे रक्षण सौमित्रवत्सल म्हणजे लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या रामाने करावे.

जिव्हा, सगळ्यात महत्वाचा अवयव. आपण काय बोलतो आणि काय खातो यावर नियंत्रणासाठी जिभेचे अनन्य साधारण महत्व आहे. तिचे रक्षण सर्व विद्या धारण करणाऱ्या श्रीरामाने करावे. भरताने ज्याला वंदन केलेले आहे. अशा रामने माझ्या कंठाचे रक्षण करावे.

दिव्य अशी शस्त्रास्त्रे ज्याच्याजवळ आहेत. जो त्याचा सांभाळ करतो आहे, आशा रामाने माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करावे. सीता स्वयंवराच्या वेळेला शिवधनुष्यचा श्री रामाने लीलया भंग केलेला होता, आशा शिवधनुष्यचा भंग करणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे.

जसे सीतेने आपले हात श्रीरामाच्या हातात दिले व ज्यांनी तिचे रक्षण केले, त्या सीतेच्या रामाने माझ्या हातांचे रक्षण करावे. जामदग्न्य जित म्हणजेच जमदग्नी ऋषींचा पुत्र परशुरामाला जिंकणारा रामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे.

शरीराचा मध्यभाग म्हणजे उदर किंवा जठराग्नी ज्याचे कार्य समान वायूवर अवलंबून असते त्या माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण खर नावाच्या राक्षसाचा वध ज्याने केला त्या रामाने करावे. जाम्बुवन्तांनी ज्याचा आश्रय घेतला त्या श्राीरामाने माझ्या नाभिचे म्हणजेच बेंबीचे रक्षण करावे.  सुग्रीवाचा स्वामी रामाने माझ्या कमरेचे रक्षण करावे.

हनुमंताचे विस्मरण काढून त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव होणे गरजेचे आहे. अशा हनुमंताचा प्रभू रामचंद्रांनी माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करावे. राक्षस कुळाचा विनाश करणाऱ्या आणि रघुकुळात श्रेष्ठ असलेल्या रामाने माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करावे. हनुमंताने जसा समुद्र ओलांडला तसा भवसागर पार करण्यासाठी माझ्या मांड्यांचे रक्षण प्रभू रामाने करावे. समुद्रावर सेतू बांधणारा जो राम आहे त्याने माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करावे.

दशमुखी रावणाचा नाश करण्यासाठी लंकेपर्यंत चालत गेलेल्या रामाने माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करावे.

रावण वधानंतर बिभीषणाला राजलक्ष्मी म्हणजे लंकेचे राज्य देणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करावे. बिभीषणाची पावले जशी योग्य मार्गाकडे वळाली तशीच माझी पावले ही वळो. शरीर हे एक यंत्र आहे. त्याचा वापर आपल्याला साधन म्हणून करायचा आहे. पुरुषार्थ सार्थ करण्यासाठी सर्वांना आनंद देणारा आनंदकंद असा जो राम आहे त्या प्रभू श्रीरामाने माझ्या सर्व शरीराचे रक्षण करावे.

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।

स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥

याप्रमाणे  रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो मनुष्य पठण करेल तो दीर्घायुषी होईल. तो सुखी होईल. तो पुत्रवान होईल आणि सर्व कार्यात विजय मिळवणारा म्हणजेच यशस्वी होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एवढे सगळे मिळून सुद्धा तो विनयसंपन्न अर्थात तो नम्र राहील.

रामरक्षेचा जप किंवा पठण रोज का करायचे, तर त्याचे काही फायदे हा रामरक्षेतच सांगितले आहेत. आपल्याला काही मिळणार असेल तर एखादी गोष्ट आपण करतो. कुठलीही गोष्ट करताना, यात मला काय फायदा आहे, मला काय मिळणार आहे याचा विचार माणूस करत असतो. ज्यांना आपदा म्हणजेच संकट नको असेल त्यांनी रामरक्षेचे पठण नियमित करावे.

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो ॥

तसेत

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥

असे, रामरक्षेत म्हटले आहे. म्हणजे आपल्याला जर सुख-संपदा हवी असेल तर आपल्याला रामाचे स्मरण करत राहायला पाहिजे. मात्र ते श्रद्धेनं करणे गरजेचे आहे. कारण, श्रद्धावान लभते ज्ञानं, असे म्हटले आहे.

रामरक्षा म्हटल्याने ऐश्वर्य, सुख संपदा मिळते का, असा प्रश्न विचारला जातो. याबाबत आपण एक गोष्ट पाहूयात. आपणा सर्वांकडे टीव्ही असतो.  आपल्याला आवडणाऱ्या  चॅनलचे बटन दाबल्यावर आपल्याला तेच चॅनल दिसते. म्हणजेच फ्रिक्वेन्सीला सेट करतो  तोच चॅनेल टीव्हीवर दिसतो. तद्वत मी माझ्या मनाची फ्रिक्वेन्सी ज्यावर सेट करतो तेच विचार मनांत येतील, तीच बुद्धी वृद्धिंगत होईल आणि तशीच कृती घडेल. म्हणून चांगल्या फ्रिक्वेन्सीला मनाचे ट्युनिंग करण्यासाठी रामरक्षेचा पाठ नित्य करणे आवश्यक आहे.

रामनवमीला श्री समर्थ रामदास स्वामींची सुद्धा जयंती आहे. ते प्रभू रामचंद्रांना समर्थ म्हणत. रामाच्या भक्तीने ते इतके एकरूप झाले की त्यांना सर्वजण समर्थ म्हणू लागले. आपण रामाचे दास व्हायचे म्हणजे आपण भगवंताचे काम करायचे. त्यांनी आपले काम केले तर कसे चालेल, असे रामदास स्वामी भक्तांना म्हणत. म्हणूनच ते म्हणतात…

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,

यत्ना तो देव जाणावा, अंतरी घटिता बरे

म्हणजेच `देव` प्रयत्न करण्याची बुद्धी, शक्ती मिळण्यासाठी ही रामरक्षा.

जय जय रघुवीर समर्थ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.