Phugewadi News : आपच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षावर कोयत्याने वार 

महागाई विरोधातील पक्षाचे आंदोलन संपल्यावर घरी जात असताना घडला प्रकार 

एमपीसी न्यूज – आपचे सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यशवंत श्रीमंत कांबळे यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले आहे. आप पक्षाने आंबेडकर चौक, पिंपरी येथे शनिवारी (दि.09) आंदोलन केले. आंदोलन संपल्यावर कांबळे घरी जात असताना फुगेवाडी बोगद्याजवळ दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. कांबळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आकाश गंगाधर मिसाळ (वय 27, रा. जगताप नगर, थेरगाव) आणि दोन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत श्रीमंत कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या वतीने शनिवारी आंबेडकर चौक, पिंपरी येथे महागाई विरोधात आंदोलन केले. या आंदोलनासाठी यशवंत कांबळे देखील उपस्थित होते. आंदोलन संपल्यावर कांबळे दुचाकीवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. आणि फुगेवाडी बोगद्याजवळ आल्यावर त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जखमी केले. कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.