Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याना घरचा रस्ता, खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

एमपीसी न्यूज : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांना हाकलण्यात आले आहे.  खान हे पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. राजकीय नाट्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास मतदान झाले. इम्रानच्या पक्षाने या मतदानात सहभाग घेतला नाही.

इम्रान यांच्या विरोधात एकूण 174 मते पडली. बहुमतासाठी 172 मतांची गरज होती. मतदानापूर्वी सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला होता. विरोधकांनी पीएमएल-एनचे अयाज सादिक यांची नवीन सभापती म्हणून निवड केली. त्यांनी मतदान पूर्ण केले. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी ”ही देशासाठी नवी पहाट आहे, लोकांची प्रार्थना मान्य झाली.” अशा भावना व्यक्त केल्या.

इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर पाकिस्तानात मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने सहभाग घेतला नव्हता. तत्पूर्वी लष्कर आणि आयएसआय प्रमुखांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान अचानकपणे लष्कराची वाहने इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. सर्व विमानतळांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

देश सोडण्यावर बंदी

दरम्यान, इम्रान खान, फवाद चौधरी आणि शाह महमूद यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तिघांचीही नावे एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर 11 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तसेच इम्रान खान यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आले आहे.

इम्रान खान यांच्या जोर बैठका

सरकार कोसळल्यानंतर इम्रान खान यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या मिटिंगमध्ये पुढील रणननीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे इम्रान खान आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.