Petrol, Diesel Rate : पेट्रोल, डिझेलचे दर आजही स्थिर; सर्वसामान्यांना दिलासा की खिशाला कात्री?

एमपीसी न्यूज – पेट्रोल-डिझेलचे दर वाढून ते मागील चार दिवसांपासून स्थिर झाले आहेत. अचानक काही दिवसात झालेल्या तब्बल 10 रुपयांच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिकांना हैराण केले आहे. मागील चार दिवसांपासून हे दर स्थिर आहेत. मात्र एवढ्या मोठ्या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती वाढत असताना सुद्धा इंधनाचे दर चार महिने स्थिर राहिले. निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 22 मार्च पासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती वाढू लागल्या. 17 दिवस किमती वाढत राहिल्या. या काळात तब्बल 14 वेळा किमती वाढल्या. सुमारे 10 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल महाग झाले.

सध्या मुंबई शहरात पेट्रोल 120.51 रुपये प्रती लिटर, डिझेल 104.77 रुपये प्रती लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रती लिटर, डिझेल  96.67 रुपये प्रती लिटर आहे. चेन्नई शहरात 110.85 रुपये प्रती लिटर, डिझेल 100.94 रुपये प्रती लिटर आहे.

कोलकाता शहरात पेट्रोल 115.12 रुपये प्रती लिटर प्रमाणे तर डिझेल 99.83 रुपये प्रती लिटर प्रमाणे विकले जात आहे. हैद्राबाद मध्ये पेट्रोल 119.49 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 105.49 रुपये प्रती लिटर प्रमाणे मिळत आहे. बेंगलोर शहरात पेट्रोल 111.09 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 94.79 रुपये प्रती लिटर प्रमाणे मिळत आहे.

मागील चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर आता इंधन स्थिर झाले असले तरी मागे झालेली दरवाढ नागरिकांच्या खिशाला पोळणारी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आर्थिक नियोजनावर याचा परिणाम होत आहे.

महागाईने नागरिक हैराण

पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता किराणा मालापासून भाज्यांचे देखील दर वाढत आहेत. दुधाच्या किमती वाढल्या आहेत. दैनंदिन निकडीच्या वस्तू महाग झाल्याने याचाही नागरिकांच्या खिशावर ताण आणणारा आहे. उत्पन्न स्थिर असून खर्च मात्र वाढू लागला असल्याने नागरिकांना वाढत्या महागाईची चिंता वाटू लागली आहे. कोरोना काळात अनेकांनी रोजगार गमावले. कोरोनाचे सावट कमी होते न होते तोच महागाई आल्याने आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची अवस्था नागरिकांची झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.