Lonavala : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज  – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने लोणावळा व खंडाळा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी साडेसात वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन झोन पुणेच्या माध्यमातून लोणावळा, खंडाळा येथील मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवन तळे, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, आय.एन.एस. ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा अशा 18 ठिकाणी 2000 हून अधिक स्वयंसेवक, सेवादल यांनी सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तसेच जाखमाता मंदिर तुंगार्ली व लोणावळा एस.टी. स्टँड जवळचा परिसरात  दोनशे हून अधिक झाडे लावली. त्याचप्रमाणे दुपारी पथरॅलीचे व पथनाट्ये सादरीकरण करून नागरिकांमध्ये वायू प्रदूषण रोखण्याविषयी जागृती करण्यात आली.

या अभियानासाठी मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरोग्य सभापती संध्या खंडेलवाल, मुख्याधिकारी सचिन पवार, संत निरंकारी मंडळाचे नगर झोनचे इन्चार्ज हरीश निरंकारी, पुणे झोन इंन्चार्ज ताराचंद करमचंदानी, क्षेत्रिय संचालक किशनलाल अडवाणी, लोणावळा मुखी महादेव, सेवादल इंन्चार्ज राजेश कनोजिया यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी संत निरंकारी मंडळाच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
भारत सरकारने चालविलेल्या भारत स्वच्छ अभियानामध्ये लोणावळा नगरपरिषदेचा देशामध्ये दुसरा क्रमांक मिळाला. त्यामध्ये निरंकारी फाउंडेशनने दिलेल्या योगदानाबद्दल संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे धन्यवाद व्यक्त केले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे पुणे झोन इंन्चार्ज ताराचंद करमचंदानी यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.