Pimpri : सफाई कर्मचाऱ्यांचे महापालिकेसमोर आंदोलन, इन-आउट गेट बंद, महापौरांसह अधिकारीही अडकले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेत रिंग झाली आहे. या निविदेमुळे 1100 कामगार बेरोजगार होणार असल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधकांसह सफाई कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. महापालिकेचे इन-आउटचे दोनही गेट बंद केले होते. त्यामुळे आयुक्तांसह अधिकारी महापालिकेत अडकले होते. आंदोलनादरम्यान स्वतः महापौरदेखील अडकल्या होत्या. पावणे सातच्या सुमारास आयुक्तांनी निवेदन स्वीकारले आहे. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. 

या आंदोलतानात राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, संदीपान झोंबाडे,  प्रल्हाद कांबळे यांच्यासह आदी कामगार सहभागी झाले आहेत. सुमारे एक तास हे आंदोलन चालले.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या अंतर्गत रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 7 वर्ष कालावधीसाठी 647  कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन नियम, अटी-शर्ती बनविण्याल्याचा आरोप होत आहे. या निविदेमुळे 1100 कामगार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे निविदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.