Pune : भाजपमध्ये असंतोष खदखदतोय

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीत भाजपने तब्बल 4 महिलांना संधी दिली. एकाही पुरुषाला संधी देण्यात आली नाही. तर, प्रभाग क्रमांक 36 मार्केटयार्ड – लोअर इंदिरानगरमधील सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे हे एकाच प्रभागातून निवडून आले आहेत.

या तिघांचाही स्थायी समितीमध्ये समावेश करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतर नगरसेवकांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करून 2017 मध्ये नगरसेवक झालेल्यांची संख्या 40 च्या आसपास आहे. या नगरसेवकांना सत्तेचा कोणताही लाभ न मिळाल्याने त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आगामी 2 वर्षांत पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी स्थायी समिती अतिशय महत्वपूर्ण आहे.

या समितीत समावेश झाला तर चांगले बजेट मिळत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. या समितीत 16 सदस्यांचा समावेश आहे. भाजपचे 10, राष्ट्रवादी 4, तर काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. या समितीत समावेश व्हावा म्हणून भाजपच्या अनेक नगरसेवकांनी प्रयत्न केले. सध्या भाजपमध्ये 4 गट पडले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गट तयार झाले आहेत. तर, पक्षावर सध्या संजयनाना काकडे नाराज असल्याची कुजबुज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.