Cold War: अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीत युद्ध…

Cold War between US and Russia शीत युद्ध होण्याची अनेक कारणे आहेत. अमेरिका भांडवलशाही विचारधारेचा देश आहे. दुस-या महायुद्धानंतर त्याला त्याची विचारधारा जगात लागू करायची होती. तर रशिया साम्यवादी देश आहे.

0

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे)- सप्टेंबर 1945 मध्ये जपानच्या आत्मसमर्पणानंतर दुसरे महायुद्ध संपले. या युद्धातून दोन नव्या ताकदींचा उदय झाला. आतापर्यंत अमेरिका एकटा सुपरपॉवर होता. पण दुस-या महायुद्धानंतर रशिया (त्यावेळचा USSR- युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक) देखील सुपर पॉवर म्हणून उदयास आला. दरम्यान, अमेरिकेने जपानवर अणुहल्ला करताना रशियाचे मत विचारात घेतले नव्हते. त्यामुळे रशिया नाराज होता. हीच नाराजी पुढे अनेक कारणांसह शीतयुद्धात बदलली. हे शीतयुद्ध 1947 पासून 1991 पर्यंत चालले.

शीत युद्ध होण्याची अनेक कारणे आहेत. अमेरिका भांडवलशाही विचारधारेचा देश आहे. दुस-या महायुद्धानंतर त्यांना त्यांची विचारधारा जगात लागू करायची होती. तर रशिया साम्यवादी देश आहे. त्यांना साम्यवाद जगभर पसरवायचा होता.

एका अर्थाने पुन्हा साम्राज्यवादच युद्धाचे प्रमुख कारण बनले. या युद्धासाठी दोन्ही देशांनी दुस-या महायुद्धानंतर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राचा देखील वापर करून घेतला. तो कसा हे पुढील भागात बघुयात.

दुस-या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रांनी जिंकलेल्या जर्मनीच्या वाटणीवरून अमेरिका आणि रशियाची कुरबुर होती. त्याची परिणती नंतर बर्लिनच्या भिंतीत झाली. बर्लिनमध्ये 155 किलोमीटर लांबीची काटेरी भिंत उभी करून या दोन महासत्तांनी जगाला अक्षरशः दोन भागात वाटले.

एक काळ होता, तेव्हा जर्मनीच्या हुकुमशाहा हिटलरला लोक प्रचंड घाबरायचे. पण हिटलरच्या मृत्यूनंतर त्याच्याच शहरात जाऊन त्याच्या शहरातून जगाचे दोन तुकडे करण्यात आले.

युनान आणि टर्की या देशातल्या स्थानिक अडचणींमध्ये अमेरिकेने आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने हस्तक्षेप केला. 23 एप्रिल 1947 रोजी अमेरिकेने मार्शल योजनेंतर्गत पश्चिम युरोपातील काही देशांना 12 अरब डॉलरची मदत जाहीर केली.

याबदल्यात अमेरिकेने संबधित देशांमध्ये साम्यवादी विचारधारेला थारा न देण्याची अट घातली. या आणि अशा अनेक कारणांमुळे रशिया आणि अमेरिका वाद आणखी वाढत गेला. यातून शीतयुद्धाला खतपाणी मिळालं.

शीतयुद्धात एक महत्वपूर्ण बाब अशी की, अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांच्या समोर येऊन कधीच लढले नाहीत. क्युबा मिसाईल क्रायसेसच्या वेळी दोन्ही देश एकमेकांच्या समोर आले, पण अचानक दोघांनी माघार घेतली आणि तिसरे महायुद्ध होता होता टळलं.

शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देशांनी इतर देशांना आर्थिक, सैन्य ताकद देऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन एकमेकांवर गोळीबार केला आहे. यात कंबोडिया, कांगो, कोरिया, इथियोपिया, सोमालिया, यांसारख्या लहान देशांची मोठी हानी झाली. त्यातच दोघांकडेही अणुशक्ती होती. त्यामुळे जर दोन्ही देश एकमेकांच्या समोर आले असते. तर अणुशक्तीचा बेसुमार वापर झाला असता. त्यामुळे जगाचा अंत देखील होऊ शकला असता.

या काळात कब्जा केलेल्या देशांवर रशियाकडून साम्यवादी विचारधारा थोपली जात होती. त्या देशांमध्ये रशियाकडून साम्यवादी सरकार नियुक्त केलं जात होतं. चीनमध्ये देखील साम्यवादी सरकार स्थापन झालं होतं, याचा फटका पुढे चीनला संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यत्वाच्या वेळी झाला.

साम्यवादी विचारधारा हुकुमशाहीला बळ देणारी आहे. त्यामुळे पुढे साम्राज्यवाद आणखी विस्तार घेईल आणि त्याचे वाईट परिणाम जगाला भोगावे लागतील, असा अमेरिकेचा दावा होता. अमेरिका साम्यवादाचा विरोध करत होता आणि भांडवलशाहीचा पुरस्कार करीत होता. अमेरिका त्याची भांडवलशाही जगात लागू करू इच्छित होता. त्यामुळे वृत्ती दोघांची सारखीच होती.

अमेरिकेने फ्रान्स, आयर्लंड, इटली, पोर्तुगाल, नॉर्वे, बेल्जियम यांसारख्या देशांना घेऊन 1949 साली नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन) ची स्थापना केली. तर रशियाने वर्साव पॅक्ट केला. यामुळे जगात पुन्हा दोन गट निर्माण झाले.

शीत युद्धाची निश्चित तारीख नाही. मात्र या काळात चार महत्वाच्या लढाया झाल्या. कोरिया युद्ध, क्युबा युद्ध, व्हिएतनाम युद्ध, अफगाणिस्तान युद्ध या चार युद्धांनी शीतयुद्ध जिवंत ठेवले.

कोरिया युद्ध

दुस-या महायुद्धापर्यंत कोरियावर जपानचा कब्जा होता. त्यानंतर कोरियाच्या उत्तर भागावर रशिया आणि दक्षिण भागावर अमेरिकेने कब्जा केला. दोन्ही भागांवर दोघांनी आपापल्या विचारधारांचे सरकार स्थापन केले.

उत्तर कोरियात रशियाने किम मिल्सन याला नियुक्त केले. तो उत्तर कोरियाचा हुकुमशहा बनला. सध्याचे हुकुमशहा किम जोंगचा ते आजोबा होता. आजही उत्तर कोरियात हुकुमशाही सुरु आहे.

दक्षिण कोरियाला अमेरिका आणि नाटोचा पाठिंबा होता. तर उत्तर कोरियावर रशियाचे समर्थन होते. 25 जून 1950 ला दुस-या महायुद्धानंतर झालेल्या विभागणीवरून दोघांमध्ये युद्ध सुरु झाले.

रशियाच्या अनुपस्थितीत अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघात उत्तर कोरियाने प्रथम दक्षिण कोरियावर आक्रमण केल्याचा ठराव मान्य करून घेतला. त्यानंतर प्रचंड जनसंहार झाल्यानंतर तणावपूर्ण परिस्थितीत हे युद्ध संपवण्यात आले. हे युद्ध निर्णायक झाले नाही. मात्र, आजही उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव कायम आहे.

क्युबा युद्ध

क्युबा हा अमेरिकेच्या अतिशय जवळ एका बेटावर असलेला देश आहे. या देशात 1958 साली रशियाने साम्यवादी सरकार स्थापन केले. क्युबात साम्यवादी सरकार स्थापन करण्यामागे रशियाचा खूप मोठा स्वार्थ होता.

रशिया 1949च्या सुमारास अण्वस्त्रधारी बनला होता. रशियाने अणुबॉम्ब हल्ल्याचे असे तंत्र विकसित केले होते, त्यामध्ये एका देशात बसून दुस-या देशात अणुहल्ला करता येऊ शकतो. क्युबामध्ये अणुबॉम्ब ठेवल्यास तिथून अमेरिकेवर निशाणा साधता येईल, या उद्देशाने रशियाने क्युबामध्ये साम्यवादी सरकार स्थापन केले.

आपल्या देशाच्या अगदी जवळ येऊन रशियाने सरकार स्थापन केले, ही बाब अमेरिकेच्या पचनी पडणारी नव्हती. अमेरिकेच्या नौदलाने 1962 मध्ये क्युबाला चारी बाजूंनी घेरले. क्युबाची कोंडी केली. त्यानंतर क्युबाच्या संरक्षणार्थ रशियानेही आपले नौदल क्युबाच्या दिशेने रवाना केले.

अमेरिकेचे जोन केनेडी आणि रशियाचे निकिता ख्रुश्चेव यांनी युद्धाचे वातावरण तयार केले. वातावरण गरम झालेले असताना अचानक दोन्ही देशांनी आपल्या नौदलांना परत फिरवले. जर हे युद्ध झाले असते, तर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली असती. याने संपूर्ण जगाचा विनाश झाला असता.

व्हिएतनाम युद्ध

व्हिएतनाममध्ये 1954 साली युद्ध सुरु झाले. इथेही कोरियाप्रमाणे उत्तर आणि दक्षिण भाग पडले होते. दक्षिण व्हिएतनामवर अमेरिका तर उत्तर व्हिएतनामवर रशियाचा हात होता. दोन्ही देशातील जुन्या वादांना अमेरिका आणि रशियाकडून खत पाणी मिळाल्याने दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात पेटून उठले. व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियाच्या प्रदेशात हे युद्ध झाले.

30 एप्रिल 1975 पर्यंत ही लढाई चालली. त्यानंतर उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम एक झाले. त्याला त्यांनी समाजवादी रिपब्लिक व्हिएतनाम असे नाव दिले. यात दक्षिण व्हिएतनामला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. यातच अमेरिकेची हार झाली, असेही म्हटले जाते.

अफगाणिस्तान युद्ध

मानवी शांती आणि समृद्धीसाठी 1972 मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये एक करार झाला. त्यानुसार दोन्ही देशांनी त्यांची अणुशक्ती कमी करण्याचा निर्णय घेतला. या शांतता करारानंतर सर्व देश शांतीच्या माध्यमातून विकासाची दारे उघडण्याचा प्रयत्न करीत होती.

त्यानंतर अशाच प्रकारचा आणखी एक शांती करार 1989मध्ये होणार होता. अमेरिका आणि रशियाकडून यासाठी दिवस देखील निश्चित झाला होता. पण त्याचवेळी अफगाणिस्तानात साम्यवादी विचारधारेचे सरकार स्थापन झाले. सरकारची ताकद वाढविण्यासाठी रशियाने त्याची सैन्य ताकद आणि शस्त्रे मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानकडे पाठवली. यामुळे हा शांती करार होऊ शकला नाही.

अमेरिका सुरुवातीपासून कट्टरतावादाचा विरोध करत आला होता. मात्र, या घटनेनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानी कट्टरवादी मुजाहिदीनला सहकार्य करण्यास सुरुवात केली. कट्टरवादी मुजाहिदीन लोक साम्यवादाच्या विरोधात होते. त्याचाच फायदा घेऊन अमेरिकेने रशियन साम्यवादाला रोखण्यासाठी मुजाहिदीनला जवळ केले.

मुजाहिदीनच्या पदाधिका-यांच्या अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये 1982 च्या सुमारास बैठका देखील झाल्या. अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून अफगाणिस्तानातल्या मुजाहिदीन गटाला हत्यारांचा पुरवठा केला.

पुढे याच मुजाहिदीन गटातून ‘अल कायदा’चा जन्म झाला. ओसामा बिन लादेन हा अल कायदाचा नेता होता. याच लादेनने पुढे जाऊन अमेरिकेवर सप्टेंबर 2001 मध्ये दहशतवादी हल्ला केला. यामुळे ‘साप पाळणं अमेरिकेच्या अंगलट आलं’ असं म्हटलं जातं. मुजाहिदीन आणि साम्यवादी यांच्यात आजही संघर्ष सुरूच आहे. या लढाईचा निर्णायक अंत अजूनही झालेला नाही.

अफगाणिस्तानमधील लढाईनंतर शीत युद्ध कमी होऊ लागलं. शीत युद्धातली सर्वात शेवटची क्रांती जर्मनीतील बर्लिन शहरात झाली. बर्लिन शहरात 13 ऑगस्ट 1961 रोजी एका रात्रीत 155 किलोमीटर लांब तारेची भिंत घालण्यात आली. त्यानंतर त्यातील 106 किलोमीटर अंतरावर भिंत बांधण्यात आली होती.

या भिंतीमुळे बर्लिनची आणि संपूर्ण जगाची दोन भागात विभागणी झाली होती. भिंतीच्या एका बाजूचा भाग रशियाकडे होता. तर दुस-या बाजूचा भाग अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्याकडे होता. 28 वर्षानंतर 9 नोव्हेंबर 1989 रोजी ही भिंत पाडण्यात आली.

शीत युद्धाच्या काळात रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली. तर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत झाली होती. 1985 साली मिखाईल गोर्बाचेव्ह हे राष्ट्रपती बनले. त्यांनी युद्धापेक्षा अधिक लक्ष अर्थव्यवस्था सुधारण्याकडे दिले.

30 डिसेंबर 1922 रोजी युनियन ऑफ सोव्हिएत सोशालीस्ट रिपब्लिकची स्थापना करण्यात आली होती. त्याचे 1991च्या काळात विघटन करण्यात आले. अनेक लहान लहान देश स्वतंत्र करून रशिया एकटा उरला.

रशियाच पोरका झाल्याने आता उत्तर कोरियावर हात ठेवणारं देखील कोणी उरलं नाही. त्यामुळे उत्तर कोरिया स्वतःला असुरक्षित समजू लागला. त्यातून उत्तर कोरियाने पुढे अणुचाचणी केली. आजही उत्तर कोरियात हुकुमशाही आहे. नागरिकांच्या वागण्या, बोलण्यासह अन्य अनेक बाबींवर कठोर बंधने आहेत.

अमेरिकेत अनेक बाबींचे खासगीकरण झाल्याने त्याची अर्थव्यवस्था सुधारल्याचे समोर आले. त्यामुळे तसा प्रयत्न रशियाने देखील केला. पण त्यातूनही अर्थव्यवस्थेला म्हणावी तशी उभारी आली नाही. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानतर 1991 मध्ये आधिकारिकरित्या शीतयुद्धाची समाप्ती झाली.

पण दरम्यानच्या काळात अमेरिका आणि रशिया यांनी संयुक्त राष्ट्र संघात अनेक घडामोडी घडवून आणल्या. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना आणि इतर घडामोडी पुढील भागात…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like