Pimpri: आयुक्तांनी उगारली शिक्षण विभागावर छडी!

शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी दिला 100 दिवसांचा अल्टिमेट

महापौरांचा शुक्रवारपासून शाळा पाहणी दौरा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या अधिका-यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. प्रशासन अधिका-यांनी  साहित्य खरेदीवर लक्ष्य केंद्रित न करता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये गुंतून रहावे. गुणवत्ता धारक शिक्षणावर भर द्यावा, अशा कडक सूचना आयुक्तांनी शिक्षण विभागातील अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच महापालिकेच्या संपूर्ण शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 100 दिवसांचा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. दरम्यान, महापौर राहुल जाधव येत्या शुक्रवार (दि.21) पासून शाळांचा पाहणी दौरा करणार आहेत. 

शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर तीन महिन्यापू्र्वी महापालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात आली. तीन महिने होऊनही प्रशासन अधिकारी आणि शिक्षण समितीची कामाची घडी रुळावर आली नव्हती. तीन महिन्यात विषयपत्रिकेवर एकही विषय रितसर आणला जात नव्हता. आयत्यावेळी विषय मंजूर केले जात होते. तसेच मंजूर केलेल्या विषयांची अंमलबजावणी देखील केली जात नव्हती. त्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर आज (सोमवारी) महापौर राहुल जाधव यांनी शिक्षण विभागाची तब्बल एक तासभर आढावा बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यासह विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. पालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लेखन, वाचन आले पाहिजे. त्यासाठी आयुक्तांनी 100 दिवसांची मुदत दिली आहे. शिक्षण अधिका-यांनी साहित्य खरेदीवर लक्ष्य केंद्रित न करता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. विषयपत्रिकेवर केवळ खरेदीचे विषय आणू नयेत. चर्चेचे विषय आणावेत. शिक्षण समितीच्या सभेला शाळेतील मुख्याध्यपकांना बोलवावे. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात याव्यात. चांगले उपक्रम केले असल्यास त्याचे सादरीकरण ठेवावे.

शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यार भर देण्यात यावा, अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच दिल्लीतील शाळांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि सदस्यांनी दिल्ली दौरा करावे, असेही त्यांनी सूचविले आहे.

नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि विनया तापकीर यांनी बैठकीची पत्रकारांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. शालेय पोषण आहाराबाबतीत तक्रार असल्यास बचत गटाकडून ते काम काढून इस्कॉन संस्थेला द्यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या असल्याचे, चिंचवडे यांनी सांगितले.

वडमुखवाडीतील खाण कामगारांच्या मुलांसाठी एक खासगी बस उपलब्ध करुन दिली आहे. त्याचे पैसे शिक्षण  विभाग अदा करतो. परंतु, एक बस विद्यार्थ्यांसाठी कमी पडत आहे. त्यामुळे खाण कामगारांची मुले शिक्षणपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखीन बस सोडण्याची सूचना केली असल्याचे, तापकीर यांनी सांगितले.

दरम्यान, महापौर राहुल जाधव शुक्रवार (दि.21) पासून महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करणार आहेत. अचानक शाळांना भेटी देऊन माहिती जाणून घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.