Pimpri : विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आक्रोश’

राष्ट्रवादीने शहरातील काँग्रेस संपविल्याचा आरोप;तीन विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसला एका जागा देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडीत तीनपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा. अन्यथा आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली. तसेच काँग्रेसने राष्ट्रवादीचे दारे ठोठावणे बंद केले पाहिजे. राष्ट्रवादीनेच शहरातील काँग्रेस संपविल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केली. लोकसभेला संयमी भूमिका घेणारे अजित पवार आता का बदलले? असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. काँग्रेसला एकतरी जागा देण्याची त्यांची मागणी आहे. ‘विधानसभेला हक्कासाठी, लढा स्वाभिमानासाठी, वाटा हवा सन्मानाचा’ या टॅगलाईन खाली काँग्रेसचा आज (गुरुवारी) मोरवाडीत ‘आक्रोश’ मेळावा पार पडला. यावेळी एनएसयुआएचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक अख्तार चौधरी, अशोक काळभोर, राजन नायर, हिराचंद जाधव, नासिर चौधरी, निखिल भोईर,  युनूस बागलान, उमेश बनसोडे, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

युनूस बागलान म्हणाले, राष्ट्रवादीने दगाफटका देऊन काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण केली आहे. वारंवार दगाफटका दिला. काँग्रेसच्या विचारावर पिंपरी-चिंचवड शहर उभारले असून शहराच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. कधीकाळी एकछत्री अंमल असलेल्या काँग्रेसला आज शहरात आक्रोश मेळावा घ्यावा लागतोय ही खंत आहे. याची काँग्रेस नेतृत्वाने गंभीर दखल घ्यावी, असे किशोर जगताप म्हणाले.

निखील भोईर म्हणाले,  राष्ट्रवादीचे दार ठोठावणे काँग्रेसने बंद केले पाहिजे. काँग्रेसच्या मतांवर राष्ट्रवादीने शहरावर राज्य केले आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादीचा देखील तीनही जागेवर पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभेला आघाडीत काँग्रेसला एक तरी जागा सोडावी. अन्यथा काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाहीत. राष्ट्रवादीने त्यांचे त्यांचे बघावे. शहरात काँग्रेसला माननारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे शहरातून काँग्रेसला संपविण्याचे काम केले. पुण्यात जागा दिल्या जातात. तर, पिंपरीमध्ये काँग्रेसला जागा का? मिळत नाही. काँग्रेसला एकही जागा सोडली नाही. तर, आम्ही राष्ट्रवादीचे काम करणार नाही. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. अपक्ष लढून काँग्रेसची ताकद दाखवून दिली जाईल. शहरात काँग्रेसचे अस्तित्व ठेवण्यासाठी दोन किंवा एक जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी  अशोक काळभोर यांनी केली. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी काँग्रेसचा सन्मान राखण्याचे आश्वासन दिले होते. मग तीन महिन्यातच त्यांच्या भूमिकेत बदल कसा झाला? असेही ते म्हणाले.

नरेंद्र बनसोडे म्हणाले, समविचारी पक्षाकडून सातत्याने गळचेपी, कुरघोडी केली जाते. अन्याय होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खदखद, खंत आहे. शहरात काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची हक्कासाठी लढाई आहे. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा काँग्रेसश्रेष्टींनी  गांभीर्याने विचार करावा. शहरातील एक मतदारसंघ काँग्रेसला सोडावा. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.