Update-Pimpri: शहरातील निर्बंध अशत: शिथिल; 16 ठिकाणे ‘कंटेनमेंट झोन’ घोषित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण वाढीची गती कमी झाली आहे. यामुळे संपुर्ण शहर कंटेनमेंट झोन (प्रतिबंधिक विभाग) करण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शहरातील निर्बंध काही प्रमाणात कमी करत केवळ 16 ठिकाणचा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून आज (सोमवार) रात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत घोषित केला आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येणार आहेत. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा सुधारित आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) काढला आहे.

कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (दि.19) मध्यरात्रीपासून आज सोमवार (दि. 27) मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण शहर सील करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दरम्यानच्या काळात रुग्ण वाढीची गती कमी झाली आहे. त्यामुळे केवळ 16 ठिकाणे ‘कंटेनमेंट झोन’ ठेवले आहेत. पुढील आदेशापर्यंत हा परिसर बंद असणार आहे.

ही आहेत 16 ठिकाणे ‘कंटेनमेंट झोन!

खराळवाडी पिंपरी, पीएमटी चौक परिसर, गुरुदत्त कॉलनी परिसर, शास्त्री चौक परिसर भोसरी, रामराज्य प्लॅनेट परिसर कासारवाडी, गणेशनगर परिसर दापोडी, संभाजीनगर परिसर, रोडे हॉस्पिटल परिसर दिघी, तनिष्क आर्किड परिसर च-होली, कृष्णराज कॉलनी परिसर पिंपळेगुरव, नेहरुनगर बस डेपो परिसर भोसरी, कावेरीनगर पोलीस लाईन परिसर वाकड, रुपीनगर परिसर तळवडे, फातीमा मशिद गंधर्वनगरी परिसर मोशी, विजयनगर परिसर दिघी आणि आदिनाथनगर परिसर पुढील आदेशापर्यंत ‘कंटेनमेंट झोन’ असणार आहे.

काय आहेत सुधारित आदेशात बदल!

# प्रतिबंधित क्षेत्रातील बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत राहणार सुरू. एटीएम सेंटर सुरू राहणार.

# सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत दूध, फळे, भाजीपाला यांची किरकोळ विक्री सुरु राहील. उर्वरित क्षेत्रात दुधाची किरकोळ विक्री सकाळी दहा ते दुपारी 12 या कालावधीत सुरु राहील. भाजीपाला, फळेविक्रीही सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर सुरु राहील.

# कंटेनमेंट क्षेत्रात चिकन, मटण विक्री सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहे. तर, उर्वरित भागात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राहणार आहे.

# कंटेनमेंट क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची विक्री सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत तर उर्वरित भागात सकाळी 10 ते 4 या वेळेत सुरु राहील.

# जीवनावश्यक वस्तूंचे औषधांचे, तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत राहील. त्यासाठी महापालिकेने दिलेला पास ग्राह्य धरण्यात येईल.

# शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने, औषधी दुकाने संपुर्ण कालावधीकरीता खुली राहतील.

# अत्यावश्यक सेवांकरिता यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास 3 मे पर्यंत लागू राहतील. त्यानंतर महापालिकेमार्फत पास घेणे.

# शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचा-यांसाठी पास महापालिका उपलब्ध करुन देईल.

# मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत विभागीय आयुक्तांचे आदेश कायम राहतील. समितीतल व्यवहरांना या आदेशामधून वगळ्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.