Bhosari : ठेकेदाराने झाड्याच्या फांद्या तोडल्या; पालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस 

प्रेमलोक पार्क येथील झाडे तोडणा-यांकडून मागविला खुलासा; कायदेशीर कारवाई करणार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल करुन शहराची हरितनगरी अशी असलेली ओळख पुसली जात आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीच्या विरोधात विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवून देखील बिनधास्तपणे तोड सुरुच आहे. मंगळवारी (दि.11) चिंचवड येथे दोन वृक्षांची कत्तल करण्यात आली. तर, आज लगेच दुस-या दिवशी भोसरीत पालिकेच्या ठेकेदाराने झाडांच्या फांद्या तोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चिंचवड आणि भोसरीतील झाडे तोडणा-यांना कारणे देखील नोटीस बजावून खुलासा मागविला असून खुलाशानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे नक्षत्रम सोसायटीच्या मागच्या बाजूच्या दोन झाडांची मंगळवारी (दि.11) बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली. वृक्षप्रेमींनी या तोडीचा भांडाफोड केला होता. त्याला 24 तास उलटून गेले तरी पालिकेच्या उद्यान विभागाने अद्यापही त्याबाबत पोलिसांकडे रितसर तक्रार केली नाही. त्यामुळे पालिका पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर वृक्षप्रेमींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

भोसरीत पालिकेच्याच एका ठेकेदाराने आज (बुधवारी) झाडांच्या फांद्या तोडल्या असल्याचे समोर आले आहे. याची माहिती होताच पालिकेने ठेकेदाराला काम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत बोलताना प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर म्हणाले, चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील दोन झाडे तोडण्यात आली आहेत. झाडे तोडणा-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागितला असून खुलासा आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर भोसरीत पालिकेच्या ठेकेदाराने झाडाच्या फांद्या तोडल्या आहेत. त्याला त्वरित काम थांबविण्याचे निर्देश दिले असून खुलासा मागविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.