Dapodi : किरकोळ कारणावरून खुनी हल्ला; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर दोन गटातील हाणामारीमध्ये झाले. या भांडणात एकमेकांवर तलवार, कोयत्याने हल्ले चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दापोडी येथे गुरुवारी (दि. 1) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी खुनी हल्ल्याचा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय ऊर्फ केट्या आनंद भिसे (वय 19, रा. एसएमएस कॉलनी, लकी बेकरीजवळ, दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय मोरे, त्याचा दाजी विजय, सागर वाल्मिके, दीपक वाल्मिके व इतर तीनजण (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी भिसे यांचा मित्र आणि गणेश अडागळे यांच्यात भांडणे सुरू होती. भिसे त्याठिकाणी थांबले असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून कोयता मारला. तर आरोपींनी तलवारीने वार केले. भिसे हे जीव वाचवून पळून गेले. आरोपींनी बा ऊर्फ फिरोज शेख यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच रमझान शेख यांची आई जुबेदा यांच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड केली.

याच्या परस्पर विरोधी फिर्याद सागर दीपक वाल्मिके (वय 16, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांनी दिली. त्यानुसार बा ऊर्फ फिरोज दिलाज शेख (वय 36), रमझान इस्माईल शेख (वय 25), ताज इस्माईल शेख (वय 22), केट्या ऊर्फ जय भिसे (वय 19, सर्व रा. गुलाबनगर, दापोडी), व अनोळखी व्यक्‍ती (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.