Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांची यंदा स्वरमयी दिवाळी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडवासीयांची दिवाळी यंदाची फराळ आणि खरेदीबरोबरच अधिकाधिक स्वरमयी करण्यासाठी विविध संस्थांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे.
चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सुगम संगीत, भक्ती संगीत व भाव गीतांच्या  स्वर गंधार या सुरेल कार्यक्रम दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. सोमवार दि. ५ नोव्हेंबरला सकाळी साडे पाच वाजता शिवतेजनगर श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजन केले आहे. या मैफलीत तानाजी पाटील (हार्मोनियम), प्रसाद कोठी (सिंथेसायजर), जालिंदर  चव्हाण (तबला ), वंदना रावलल्लू, दिगांबर राणे, जयश्री पवार, सागर उपासे आणि सहकलाकार सादर करणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन नारायण सदाशिव बहिरवाडे यांनी केले.
सोहम योग साधना व फोरम फॉर म्युझिक फाऊंडेशनच्यावतीे स्वरबहार या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम रविवार दि. ४ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता चिंचवड येथील प्रा, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका अपर्णा डोके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निलेश डोके यांनी केले आहे.

ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राच्या मुक्तिसोपान संगीत विद्यालयाकडून प्रतिवर्षी धनत्रयोदशीला दिवाळी पहाट ह्या सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मुक्तिसोपान मधील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात.यावर्षी आम्ही ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात ‘स्वच्छता’ हा मुख्य सूत्रविषय ठरवला आहे. वर्षभर स्वच्छता विषयक अनेक कार्यक्रम शाळेत चालू आहेत.
संगीतातील सुरांनी मन स्वच्छ, निर्मळ व्हावे व अशा मनात परमेश्वराने वास करावा म्हणून यंदाच्या दिवाळी पहाट या संगीत मैफलीत सुप्रसिद्ध गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर ( कट्यार काळजात घुसली , संगीत सौभद्र फेम) या नाट्यपदे , अभंग ,भक्तिगीते सादर करणार आहेत. दि. ५ नोव्हेंबरला सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत ही दिवाळी पहाट संगीत सभा होणार निगडी येथील मनोहर वाढोकार सभागृह येथे होणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानतर्फे  (ता. ४) वसुबारसेनिमित्त सायंकाळी सहा वाजल्यापासून गो-माता पूजनाला सुरुवात होणार आहे. रात्री आठ वाजल्यापासून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवारी ( दि. ५ ) सकाळी सहा वाजता सूरमयी पहाटचा आनंद घेता येणार आहे.  ग्वालियर घराण्याचे विशाल मोघे (पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य) यांचे गायन होणार आहे. प्रणव गुरव (तबला),  केवल कावळे (हामोर्निअम) साथ करणार आहेत. तर कार्यक्रमाचे निवेदन रेवती सौदीकर करणार असून माधुरी आंबेकर यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.