Dehuroad : मूल होण्यासाठी उपचाराच्या नावाखाली दाम्पत्याची फसवणूक

एमपीसी न्यूज – मूल होण्यासाठी औषधे देतो, उपचार करतो, एक महिन्यात रिझल्ट देतो, असे म्हणून तोतया डॉक्टरने महिलेची तपासणी करून तपासणी फी आणि औषधांच्या नावाखाली एका दाम्पत्याची 51 हजार 500 रूपयांची फसवणूक केली. ही घटना देहूगाव येथे नुकतीच उघडकीस आली.

याप्रकरणी 29 वर्षीय इसमाने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. करीम (वय-40, रा. कांदा कॉलनी, पनवेल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मुलबाळ होत नव्हते.  डॉ. करीम याने फिर्यादी यांना मुल होण्यासाठी औषधे देतो, उपचार करतो, एक महिन्यात रिझल्ट देतो, असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या देहूगावातील घरी येऊन त्यांच्या पत्नीची आरोपीने तपासणी केली. तपासणी फी म्हणून 40 हजारांची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी 24 हजार 500 रूपये दिले.

आरोपी डॉक्टरने फिर्यादी यांना डांगे चौकातील एका मेडिकलमधून औषधे आणण्यास सांगितली. फिर्यादी यांनी 27 हजारांची औषधे घेतल्यानंतर आरोपीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. फौजदार येडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.