Talegaon News : आजारी पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीला चक्कर येत होती, तसेच तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिने पतीला सांगितले. त्यावेळी पतीने आणि त्याच्या नातेवाईकांनी मिळून आजारी पत्नीला बेदम मारहाण केली. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली असून याबाबत १ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा मनोज कोटे (वय 23, रा. तळेगाव) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती मनोज सुरेश कोटे (वय 32), पुष्पाबाई सुरेश कोटे (वय 60), दीपक सुरेश कोटे (वय 29), सारिका दिगंबर शेटे (वय 36), दिगंबर शरद शेटे (वय 38, सर्व रा. तळेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जानेवारी रोजी रात्री फिर्यादी यांना चक्कर येत होती, तसेच त्यांच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्यांनी पती मनोज यांना सांगितले. त्यावेळी ‘मी आत्ता तुझ्याकडे बघू कि घराकडे बघू’ असे म्हणून मनोज यांनी फिर्यादीला डोक्यात मारले.

त्यानंतर अन्य आरोपींनी फिर्यादी महिलेचे हात पाय धरून मारहाण केली. फिर्यादीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांचे तोंड दाबले. मनोज याने फिर्यादी महिलेला पोटात लाथ मारली, तसेच हाताला चावा घेऊन जखमी केले. आरोपी दीपक याने काठीने मारले. पीडित फिर्यादी महिलेला नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तिथे त्यांच्या फिर्यादीनुसार मालेगाव छावणी नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिथून हा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.